लोकसत्ता टीम
चंद्रपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा १३ मे रोजी होत आहे. परंतु, १२ मे रोजी होणाऱ्या पेपरमुळे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित बी.एड.च्या चौथ्या सेमिस्टरचे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून मुकणार होते.
त्यामुळे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी १२ मे रोजी होणाऱ्या पेपरची तारीख पुढे ढकलण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार विद्यापीठाने तारखेत बदल करीत १२ मे रोजी होणारा पेपर आता २४ मे रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने उन्हाळी २०२३ च्या परीक्षा सुरू आहेत. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बी. एड. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा जेंडर स्कूल अँड सोसायटी या विषयाचा पेपर १२ मे रोजी घेण्याचे ठरले होते.
आणखी वाचा-अमरावती विद्यापीठातील विविध पदांच्या भरतीची दिशाभूल करणारी जाहिरात समाज माध्यमांवर
परंतु, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ मे रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा होत आहे. या परीक्षेचे मुंबई येथे एकमेव केंद्र आहे. लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले अनेक विद्यार्थी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आहेत.अनेक विद्यार्थ्यांवर या परीक्षेपासून मुकावे लागण्याची वेळ येणार होती. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार सुधाकर अडबाले यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे बीएडच्या चौथ्या सेमिस्टरचा १२ मे रोजी होणाऱ्या पेपरच्या तारखेत बदल करण्याची मागणी करणारे पत्र पाठविले होते.
त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत १२ मे रोजी होणाऱ्या पेपरच्या तारखेत बदल करत २४ मे रोजी घेण्याचे ठरविले आहे. तसेच सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बी.एड.चे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी अडबाले यांचे आभार मानले आहे.