नागपूर: मध्य रेल्वे सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान मार्गाचे दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. त्यासाठी काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
२९ ऑक्टोबर (रविवार) ते २ नोव्हेंबरपर्यंत (गुरुवार) प्री-नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येईल, तर नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक २ नोव्हेंबर (गुरुवार) सायंकाळी ६ वाजतापासून ३ नोव्हेंबर (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजतापर्यंत राहणार आहे. त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येत आहे.
०२१४३ पुणे – नागपूर विशेष ही गाडी ३ नोव्हेंबरला दुपारी ४ ऐवजी सायंकाळी ६.१५ वाजता सोडण्यात येईल. २२१२३ पुणे- अजनी एक्स्प्रेस ३ नोव्हेंबरला दुपारी ३.१५ ऐवजी ४.१५ वाजता सुटणार आहे. ०१४३१ पुणे – गोरखपूर विशेष गाडी ३ नोव्हेंबरला दुपारी ४.१५ ऐवजी सायंकाळी ७.१५ वाजता सोडण्यात येईल, असे जनसंपर्क विभाग, मुख्यालय, मध्य रेल्वे, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.