नागपूर : सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नाहीय. बघता-बघता सोने-चांदीच्या दराने नवीन उच्चांक गाठला आहे. सर्वोच्च दरावर गेल्यावरही ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी नागपुरात ग्राहकांनी जोरात दागिन्यांसह नाणे खरेदी केली. बघता- बघता दिवसभरात सुमारे साडेचारशे कोटींचा व्यवसाय झाला. धनत्रयोदशीच्या दुसऱ्याही दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोने- चांदीचे आजचे दर किती? बघूया..
नागपुरातील सराफा व्यावसायिकांच्या अंदाजानुसार धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर २४ तासांत ग्राहकांनी सुमारे दोनशे किलो सोने आणि दीडशे किलो चांदीपासून तयार दागिने, नाण्यांची खरेदी केली. त्यापैकी अनेक दागिने, नाण्यांसाठी नोंदणी आधीच करून ग्राहकांनी पैसेही भरले होते. त्यामुळे अग्रीम नोंदणी केलेल्यांच्या चेहऱ्यावर दरवाढीतही मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीच्या खरेदीत बचत झाल्याचा आनंद होता.
हेही वाचा >>>अरेच्चा! पक्ष एक अन् उमेदवार दोन; आता पुढे काय?
दरम्यान, नागपुरात धनत्रयोदशीला मंगळवारी (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे वेळेवर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मात्र वाढीव दराने दागिने, नाणे खरेदीसाठी जास्त खिसा रिकामा करावा लागला. धनत्रयोदशीच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी (३० ऑक्टोबर) नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८० हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६२ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५२ हजार १०० रुपये नोंदवले गेले. सोन्याचे दर आजपर्यंतच्या इतिहासात विक्रमी उंचीवर गेले आहे, तर बुधवारी प्लॅटिनमचे दर प्रति दहा ग्राम ४४ हजार रुपये नोंदवले गेले. प्लॅटिनमचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे.
हेही वाचा >>>भाजप बंडखोर उमेदवार म्हणतात, आमची ‘ निष्ठावंत भारतीय जनता पार्टी…’ ! …
चांदीचे दरही एक लाखावर
नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी ३० ऑक्टोबरला (बुधवारी) चांदीचे दर प्रति किलो १ लाख रुपये नोंदवले गेले. हे दर धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोबरला प्रति किलो ९८ हजार ८०० रुपये नोंदवले गेले होते. त्यामुळे चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल १ हजार २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच सध्या सोने- चांदीचे दर जास्त असले तरी भविष्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचा सराफा व्यवसायिकांचा अंदाज आहे. त्यामुळे आताही सोने-चांदीत गुंतवणूक फायद्याची असल्याचा सराफा व्यवसायिकांचे म्हणणे आहे.