नागपूर: नागपूरसह विदर्भात लहान मुलांच्या विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल झाल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. हा प्रकार बघून शहरातील बालरोगतज्ज्ञही आश्चर्य व्यक्त करत आहेत. या लक्षणांमुळे बालकांमध्ये विविध समस्या उद्भवत असून शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाबाबत आपण जाणून घेऊ या.

ॲकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूर शाखेच्या वतीने प्रेस क्लबमध्ये महापेडिकॉन परिषदेच्या माहितीसाठी आयोजित पत्रपरिषदेत बालरोग तज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली. डॉ. संजय पाखमोडे म्हणाले, हल्ली बालरोग तज्ज्ञांकडे चिकनगुनियासह इतरही आजाराची लक्षणे असलेले रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांमध्ये विविध आजारांचे निदान होत आहे. विशेष म्हणजे, लक्षणांमध्ये बदल झाला आहे. यातील काहींना आधी करोना होऊन गेल्याचे समोर आले आहे. प्रत्येक आजाराच्या मुलांमध्ये वेगवेगळी लक्षणे बघायला मिळतात. त्यामुळे आजाराचे अचूक निदान व उपचाराचे आव्हान डॉक्टरांसमोर आहे.

हेही वाचा >>> ‘धूम स्टाईल’ वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली

डॉ. विनीत वानखेडे म्हणाले, चिकनगुनिया झालेल्या काही बालकांमध्ये गंभीर लक्षणेही बघायला मिळत आहेत. त्यानुसार काही बालके शॉकमध्ये जात आहेत तर काहींना जीवनरक्षण प्रणालीवर ठेवण्यापर्यंत स्थिती गंभीर झाली आहे . त्यामुळे चिकनगुनिया गंभीर रूप धारण करत असल्याचे चित्र आहे. डॉ. संजय देशमुख म्हणाले, नागपुरातील चित्र बघितल्यास चिकनगुनियाचा त्रास प्रौढांमध्ये सर्वाधिक असून १० ते १८ वयोगटातील मुलांमध्ये त्यातुलनेत कमी आहे. शून्य ते १० वयोगटात आणखी कमी लक्षणे बघायला मिळतात. प्रौढांच्या तुलनेत लहान मुले मात्र लवकर आजारातून बाहेर पडतात. यंदा मात्र काही बालकांच्या बरे होण्याचा कालावधी लांबलेला दिसत आहे. डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, प्रौढांपासून लहान मुलांपर्यंत बऱ्याच बालकांच्या चेहऱ्यावर चिकनगुनियानंतर काळे डाग बघायला मिळत आहेत. या रुग्णांना पूर्वीच्या तुलनेत हात- पायासह शरीराच्या इतर भागात वेदना जास्त काळ जाणवतात. या पत्रकार परिषदेला डॉ. उदय बोधनकर, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. ऋषी लोडया, डॉ. सुचित बागडे, डॉ. मिना देशमुख उपस्थित होते.

हेही वाचा >>> धमकीसत्र थांबेना… नवनीत राणा, रवी राणांना पोलीस सुरक्षा पुरविण्‍याची मागणी

‘महापेडिकॉन’ उद्यापासून

बालरोग तज्ज्ञांची महापेडिकाॅन परिषद १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशाच्या वेगवेगळ्या भागातील दीड हजारावर बालरोग तज्ज्ञ सहभागी होतील. परिषदेत बालरोगाशी संबंधित नवनवीन उपचाराचे तंत्र, नवीन अभ्यासक्रम, नवीन आजार, नवीन संशोधनात्मक विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती डॉ. उदय बोधनकर यांनी दिली. डॉ. पंकज अग्रवाल म्हणाले, चिकनगुनियासह विविध आजारांतील बदलांवरही या परिषदेत मंथन होईल.