लोकसत्ता टीम
बुलढाणा: महाराष्ट्राची अस्मिता, प्रेरणा आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंची रविवारी जयंती. यानिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजामध्ये जिल्ह्यासह राज्य भरातील हजारो भाविक दाखल होऊन राजमातेला मानाचा मुजरा करतात. यानिमित्त कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले.
सिंदखेड राजा येथे रविवारी, १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठया प्रमाणावर साजरा होतो. मिळेल त्या वाहनाने हजारो भक्त सिंदखेडराजात दाखल होतात . यामुळे वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता राहते. यामुळे कायदा व सुववस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक .७५३(सी) पुणे-नागपूर वरील व राज्य महामार्ग क्रमांक ५१ सिंदखेडराजा -देऊळगाव राजावरील वाहतूक मध्ये बदल करण्यात आले आहे . या दोन मार्गावर मोठ्या संख्येत मालवाहतूक करणारी वाहने येजा करतात. यामुळे हजारो जिजाऊ भक्तांची आणि त्यांच्या वाहनांची अडचण होऊ नये म्हणून जड वाहतुक अन्य मार्गांनी वळविण्यात आली आहे.
आणखी वाचा-मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…
काय आहे बदल
अकरा जानेवारीचे रात्री १ वाजेपासून हे बदल करण्यात आले असून आज १२ जानेवारीचे रात्री १२ वाजेपावेतो पर्यायी मार्गाने जड वाहनाची वाहतूक।होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहे.
सध्याचा प्रचलित मार्ग जालना-सिंदखेडराजा-मेहकर ऐवजी पर्यायी मार्ग जालना-देऊळगाव राजा-चिखली-मेहकरचा वापर करावा लागत आहे. मेहकर-सिंदखेडराजा-जालना ऐवजी मेहकर-चिखली दे.राजा-जालना या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे . तसेच देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा- सिंदखेड राजा ते देऊळगांव राजा या मार्गावरील जड वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकविरुद्ध मुंबई पोलीस वाहतुक अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.