राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांनी सात प्राध्यापकांकडून खंडणी वसूल केल्याच्या तक्रारीनंतर आता कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी कठोर पावले उचलली असून तीन दिवसांच्या आत धवनकर यांना स्पष्टीकरण मागितले आहे. सोबतच स्पष्टीकरणानंतर प्राथमिक आणि विभागीय चौकशी करून धवनकरांविरुद्ध पोलिसात आरोपपत्रही दाखल करणार असल्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. याशिवाय कुलगुरूंच्या नावानेही कुणी धमकी देत खंडणी वसूल करत असल्यास तात्काळ तक्रार करावी, असे परिपत्रकही काढले आहे.
विद्यापीठाच्या सात विभागप्रमुखांना लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल करणारे डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधातील तक्रारीने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. असे कृत्य करणाऱ्या धवनकरांविरुद्ध विद्यापीठाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे कुलगुरूंनी डॉ. धवनकर यांना तीन दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे. स्पष्टीकरण मिळाल्यावर विद्यापीठाकडून प्राथमिक व विभागीय चौकशी होणार आहे. यानंतर आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यताही कुलगुरूंनी व्यक्त केली आहे. प्रकरण फार गंभीर असून चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, असेही कुलगुरूंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कुलसचिवांकडून शुक्रवारी तक्रार प्राप्त झाली असून दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी तात्काळ दखल घेत धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदाचा प्रभार काढून घेतल्याचे कुलगुरूंनी सांगितले. यासंदर्भात तक्रार करणाऱ्या सातही प्राध्यापकांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. तक्रारकर्ते मागे न हटता चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. त्यामुळे अशा गंभीर प्रकरणावर विद्यापीठ शांत बसणार नाही, अशी खात्रीही डॉ. चौधरींनी दिली.
हेही वाचा: अमरावती: ‘चार गुजराती’ करताहेत सरकारी कंपन्या खरेदी-विक्रीचे काम; अबू आझमी यांची टीका
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावानेही वसुली?
डॉ. धवनकर यांच्या प्रकरणानंतर ‘कॅश’ पदोन्नती मिळवून देण्यासाठी काही लोक कुलगुरू किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव वापरून खंडणी वसूल करत असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे याची तात्काळ दखल घेत कुलगुरूंनी परिपत्रक काढून सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना तक्रार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठल्याही कर्मचाऱ्याला पदोन्नती व लैंगिक शोषणाची धमकी किंवा प्रलोभन दिले जात असल्यास त्यांनी थेट कुलगुरूंना तक्रार करावी अशा सूचना आहेत.
हेही वाचा: ‘हर हर महादेव’ चित्रपटातून शिवरायांचे चारित्र्यहनन : नाना पटोले
पोलीस आयुक्तांद्वारे चौकशी करा
डॉ. धवनकर यांच्या कृत्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे धवनकर यांना तात्काळ निलंबित करून अशा गंभीर प्रकाराची चौकशी ही पोलीस आयुक्तांकडून करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे केली. कुलगुरूंना निवेदन देताना शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, अनिल बोकडे, सुमित बोड़खे, विश्वजीत सावडिया, निशांत निमजे, प्रणव म्हैसेकर उपस्थित होते.
धवनकर मौनातच
सात प्राध्यापकांच्या गंभीर तक्रारीनंतर डॉ. धवनकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी दूरध्वनी आणि संदेशालाही प्रतिसाद दिला नाही.