नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात मंगळवार, २५ ला राजूरा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वाघांची शिकार आणि त्यांच्या अवयवांचा बेकायदेशीर व्यापार या सर्व गोष्टींचा तपशीलवार तपास केल्यानंतर निर्धारित वेळेच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांतील तपासात एक हजार पानांचा दस्तऐवज समोर आला आहे. आरोपपत्रात आंतरराष्ट्रीय सिंडिकेटमध्ये २९ आरोपींची नावे आहेत, परंतु ईशान्येकडील तीनसह फक्त १३ जणांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश यासारख्या व्याघ्र राज्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या टोळ्यांनी ७०-८० वाघांची शिकार केली असा अंदाज आहे. दोन महिन्यांपूर्वी मध्य चांदा वन विभागाच्या राजुरा वनक्षेत्रातून वाघाची शिकार उघडकीस आली. या एका शिकार प्रकरणाचा गुंता उलगडताना वाघांच्या शिकारीचे मोठे सत्र उघडकीस आले. यापूर्वी दोनदा उघडकीस आलेल्या वाघांच्या शिकार प्रकरणांपेक्षाही हे प्रकरण मोठे असल्याची कबूली वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे दिली.
त्यामुळेच सर्व वरिष्ठ अधिकारी या तपासात सहभागी झाले. गेल्या दोन महिन्यांत स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विशेषपणे स्थापन केलेल्या तपास पथकांद्वारे या प्रकरणाची सखोल आणि संयुक्त चौकशी करण्यात आली. प्रादेशिक वन विभागाव्यतिरिक्त महाराष्ट्र वनखात्याचे सर्व विभाग, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि विशेष व्याघ्र संरक्षण दल, सामाजिक वनीकरण विभाग आणि मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाचे अधिकारी या तपासात सहभागी होते. याशिवाय मध्यप्रदेश व्याघ्र कार्यदल, चंद्रपूर पोलीस विभाग आणि मेघालय वन विभागाने देखील तपास प्रक्रियेत सहभागी झाले. या सर्व तपासानंतर हे प्रकरण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मोठ्या प्रमाणात संघटित गुन्हेगारी विश्वाचा भाग असल्याचे समोर आले. भारतातील विविध ठिकाणांहून वाघांचे अवयव पुरवले जातात, हेही यातून समोर आले. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींना पकडण्याचे काम अजूनही सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासात वरखात्याचे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी सहभागी आहेत.