अकोला : धर्मादाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळात गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक अडचणी आल्या आहेत. संकेतस्थळ संथगतीने चालत असल्याने त्याचा कामकाजाला मोठा फटका बसला आहे. या अडचणीमुळे हिशोब पत्रके सादर करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचे परिपत्रक धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी ३० डिसेंबरला काढले. आता ३१ जानेवारी २०२५ पर्यंत हिशोब पत्रके ऑनलाइन जमा करता येणार आहेत.
सामाजिक संस्था, सार्वजनिक संस्था, संघटना, मंडळे यांचे कामकाज धर्मादाय कार्यालयांतर्गत येते. या सर्व संस्थांची नोंदणी करणे, त्यांचे वर्षाला नूतनीकरण करणे, दरवर्षी लेखापरीक्षण सादर करणे, हिशोब पत्रके सादर करणे ही सर्व कामे धर्मादाय कार्यालयांतर्गत केली जातात. धर्मादाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळात गेल्या काही महिन्याभरापासून न्यासांची नोंदणी, हिशोब पत्रके जमा करण्याचे कामकाज प्रभावित झाले.
हेही वाचा – गोंदिया : रेल्वेचे नवे वेळापत्रक, १ जानेवारीपासून काय बदल होणार?
या अडचणीमुळे पक्षकार, वकील व न्यासांच्या नोंदणीसह विविध कामकाजांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील धर्मादाय कार्यालयात महिन्याला शेकडो न्यासांची नोंदणी होते. त्यांची हिशोब पत्रके सादर होतात. मात्र, संकेतस्थळाच्या ‘सर्व्हर डाऊन’ होण्यामुळे कामकाजात अडचणी आल्या आहेत. या तांत्रिक अडचणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने येत आहेत. शेवटच्या मुदतीमध्ये हिशोब पत्रके सादर करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ही समस्या येत असल्याचे बोलल्या जाते.
सार्वजनिक संस्थांचे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपते. त्यानंतर पुढील सहा महिन्यात त्यांनी हिशोब पत्रके सादर करणे व त्याचे प्रमाणपत्र धर्मादाय कार्यालयाकडून प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. मात्र, संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम चांगलेच प्रभावित झाले. त्यामुळे धर्मादाय आयुक्तालयाने त्यासाठी संस्थांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपुष्टात आल्यावर देखील संकेतस्थळाची संथगती कायम असल्याने अद्यापही अनेक स्वयंसेवी संस्थांना आपली हिशोब पत्रके ऑनलाइन जमा करता आलेली नाहीत. त्यामुळे आता धर्मादाय आयुक्तालयाकडून हिशोब पत्रके सादर करण्यासाठी ३१ जानेवारी २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
हेही वाचा – चंद्रपूरमध्ये ९१ टक्के नागरिकांचा ‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट’ला कौल; नेमकं झालं काय?
उंबरठे झिजवण्याची वेळ
दिवाळीपासून धर्मादाय आयुक्तालय कार्यालयाच्या ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक अडचण येत आहेत. सार्वजनिक संस्थांच्या वेगवेगळ्या कामासाठी वकील, नागरिक कार्यालयात येतात. अनेक जण बाहेर गावावरून कामासाठी येत असतात. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्यांची निराशा होत असून कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.