यवतमाळ : कुठल्याही प्रसंगाचे छायाचित्र समाज माध्यमांवर अपलोड करण्याची स्पर्धा हल्ली तरुणाईमध्ये दिसते. मात्र यवतमाळातील एका विद्यार्थिनीस तिचे समाजमाध्यमावरील छायाचित्रच मनस्ताप देणारे ठरले. पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने या विद्यार्थिनीचे छायाचित्र वापरून इंस्टाग्राम, फेसबुकवर आठ बनावट खाती उघडली. ही बाब विद्यार्थिनीच्या एका मित्राच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात वास्तव्यास असलेला विकास तोफसिंग राठोड, (रा. कोहीनूर कोटीयार्ड-१, वाकड, पुणे, ह.मु. यवतमाळ) याने यवतमाळातील एका मुलीचा फोटो वापरून इंस्टाग्राम, फेसबूकवर चक्क आठ बनावट खाती उघडली. तो मुलगी बनून याच खात्यांद्वारे अनेकांच्या संपर्कात होता. या संदर्भात मुलीने २७ फेब्रुवारी रोजी सायबर सेलकडे तक्रार दिली होती. अज्ञात व्यक्तीने मानसिक त्रास होवून बदनामी व्हावी, या उद्देशाने फेसबूकवर सात आणि इंस्टाग्रामवर एक असे आठ बनावट खाते तयार केले, असे तिने तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी तक्रारीची गंभीरतेने दखल घेत गुन्हे नोंद करून तपास सुरू केला.

हेही वाचा – नाशिक: बड्या थकबाकीदारांकडील वसुलीत राजकीय अडथळे; जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

तपासादरम्यान पोलिसांना फेसबूक आणि इंस्टाग्रामकडून माहिती प्राप्त झाली. याच मुलीचे छायाचित्र वापरून आसाममधील एकाने तिचे बनावट खाते उघडल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचे तांत्रिक विश्लेषण केले. या गुन्ह्यामध्ये २२ एप्रिल रोजी विकास राठोड या युवकाचे नाव निष्पन्न झाल्याने त्याला नोटीस पाठवून सोमवारी सायबर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविले. त्याचा मोबाइल हस्तगत केला. तेव्हा त्यानेच ही बनावट खाती उघडून मुलीस मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा – सुरळीत वीज पुरवठ्यासाठी धुळ्यात ठाकरे गटाचे आंदोलन

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक मनिष दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक विकास मुंढे आदींनी केली. कोणत्याही प्रसंगांची छायाचित्रे समाज माध्यमांवर टाकताना त्याचा कुठे गैरवापर तर होणार नाही, याबाबत तरुणाईने दक्ष राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatting by creating eight fake accounts of a student from yavatmal nrp 78 ssb
Show comments