अमरावती : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक प्रमाणात नफा मिळेल असे आमिष दाखवून शहरातील ५१ वर्षीय शिक्षकाला सायबर लुटारूंनी ३३ दिवसांत २१ लाख ९२ हजार रुपयांनी फसवले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिक्षकाने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लक्ष्मीकांत शंकर गायकवाड (५१, रा. आचलविहार, अमरावती) असे तक्रारदार शिक्षकाचे नाव आहे. लक्ष्मीकांत गायकवाड यांना दोन महिन्यांपूर्वी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी समाज माध्यमावरील एका समुहावर जोडण्यात आले. त्या समुहातील सर्व सहभागी शेअर बाजाराशी संबंधित होते. त्या समूहामध्ये तीच चर्चा आणि गुंतवणूक केल्यास कोणाला किती फायदा झाला, हे दाखवण्यात येत होते. यातच गायकवाड यांनाही गुंतवणूक केल्यास अधिक नफा देण्यात येईल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळे गायकवाड यांनी समूहामधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीला त्यांना नफा झाल्याचे दाखवण्यात आले.

हेही वाचा >>>न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…

दरम्यान त्यांना एका अॅप्लिकेशनवर स्वतःचे खाते बनवायला सांगितले. त्यांनी ते खाते तयार केले. त्या खात्यावर त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम तसेच झालेला फायदा हे दिसत होते. मात्र ते आभासी अकाउंट होते. ही बाब मात्र गायकवाड यांना महिनाभरानंतर लक्षात आली. कारण या अकाउंटवर गुंतवलेली व फायदा झालेली रक्कम दिसत होती, मात्र ती काढता येत नव्हती. गायकवाड यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता रक्कम निघाली नाही. त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यांनी ग्रुपमधील काहींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही प्रतिसाद देत नव्हते. दरम्यान, गायकवाड यांनी २ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या ३३ दिवसात २१ लाख ९२ हजार रुपये याच ठिकाणाहून शेअर बाजारात गुंतवले होते, मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांसोबत संपर्क केला. पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून शिक्षकाची रक्कम ‘होल्ड’ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी १० लाख रुपये वाचविण्यात सायबर पोलिसांना यश आले.

जानेवारी महिन्यांपासून शहरातील पोलीस ठाण्यांत सायबर विषयक एकूण ७२ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये ७ कोटी ७३ लाखांची फसवणूक झाली आहे. या ७२ गुन्ह्यांपैकी २३ गुन्हे हे गुंतवणुकीशी संबंधित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हे शेअर बाजारामध्ये फसवणुकीच्या नावे झालेले आहेत.

Story img Loader