अकोला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे- २०२२’ ही योजना सपशेल अपयशी ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य व गरीब लाभार्थ्यांना घरकुल बांधून देण्याचे आश्वासन देत त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ६९ हजार लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहरप्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहरप्रमुख (अकोला पूर्व) राहुल कराळे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक व घरकुलासाठी अर्ज दाखल केलेले हजारो लाभार्थी मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….

ग्रामीण भागात ६९ हजार लाभार्थी पात्र ठरविण्यात आले असून, २९ हजार अर्ज अपात्र केले आहेत. मागील मागील सहा वर्षांच्या कालावधीत जिल्हाभरात पाच हजारांच्या आसपास घरकुले पूर्ण झाली आहेत. शासन व प्रशासनाकडून होणाऱ्या टोलवाटोलवीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी उघड्यावर दिवस काढावे लागत आहे.

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : ‘या’ रेल्वेगाड्या १४ दिवसांकरिता रद्द

२०१६ मध्ये पीएम आवास योजना जाहीर केली. यावेळी सर्वांना घरे देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले. ही योजना प्रत्यक्षात सपशेल अपयशी ठरल्याची टीका आ. देशमुख यांनी केली. मनपा क्षेत्रासाठी सहा हजार लाभार्थी पात्र ठरले असले तरी सहा वर्षांच्या कालावधीत केवळ १२२७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. केंद्र व राज्य शासनाच्या जाचक अटीमुळे लाभार्थी त्रस्त असल्याचे ते म्हणाले.

शहरातील मदनलाल धिंग्रा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाने गांधी मार्ग, पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट देऊन निवेदन सादर केले. घरकुलपासून वंचित असणाऱ्या तब्बल ५० हजार जणांचे अर्ज शिवसेनेला प्राप्त झाले. ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आली. शिवसेनेच्या घरकुलासाठीच्या मोर्चात हजारो प्रलंबित लाभार्थी सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating poor people by prime minister narendra modi allegation of mla nitin deshmukh ppd 88 ysh
Show comments