नागपूर : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘गामिनी’ नावाच्या मादी चित्ताने रविवारी पाच बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे आता कुनोत बछड्यांसह चित्त्यांची संख्या आता २६ झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांमध्ये मादी चित्ता ‘गामिनी’ चा समावेश होता. ती आता पाच वर्षांची असून तिने रविवारी पाच बछड्यांना जन्म दिला. यानंतर भारतात जन्मलेल्या चित्त्यांची संख्या १३ वर पोहचली आहे. भारतीय भूमीवर चौथ्यांदा चित्यांचा जन्म झाला आहे. यापूर्वी नामिबिया येथून आणलेल्या तीन मादी चित्त्यांनी बछड्यांना जन्म दिला होता. तर रविवारी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या मादी चित्त्याने बछड्यांना जन्म दिला आहे. याआधी यावर्षी जानेवारीमध्ये नामिबियातील चित्ता ‘ज्वाला’ आणि ‘आशा’ यांनी राष्ट्रीय उद्यानात सात चित्त्यांच्या बछड्यांना जन्म दिला होता.
हेही वाचा >>>चंद्रपूर : लोकसभा उमेदवारीसाठी वडेट्टीवार विरूध्द धानोरकर वाद! शिवानी वडेट्टीवार समर्थकांसह थेट दिल्लीत…
यापूर्वी, गेल्यावर्षी सात प्रौढ चित्ता आणि तीन शावकांचा मृत्यू झाल्यानंतर चित्ता भारतीय परिस्थितीशी जुळवून घेत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, यावर्षी व्यवस्थापनाने विशेष लक्ष देऊन काळजी घेतली. कुनो राष्ट्रीय उद्यानातील वनाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक कर्मचारी यांनी राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी तणावमुक्त वातावरण सुनिश्चित केले. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच यशस्वी प्रजनन शक्य झाले.केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी चित्त्यांच्या बछड्यांचे छायाचित्र ‘एक्स’ या समाजमाध्यमांवर सामायिक करत चित्त्यांच्या बछड्यांच्या जन्माची घोषणा केली. त्यांनी वनअधिकारी, पशुवैद्यकीय डॉक्टर आणि क्षेत्रीय कर्मचारी यांचे अभिनंदन केले.