नागपूर : दक्षिण आफ्रिकेतून मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांचे स्थलांतरण करण्यात आल्यानंतर त्यासंबंधी एकूण घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी नऊ सदस्यीय ‘चित्ता टास्क फोर्स’ची स्थापना केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने केली आहे. या टास्क फोर्सच्या सूचनेनंतरच चित्ता पर्यटन शक्य होणार आहे.

 राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ‘चित्ता टास्क फोर्स’ ला पूर्णपणे सहकार्य करणार असून त्यांचे काम सुलभ करेल, असे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने म्हटले आहे. ‘चित्ता टास्क फोर्स’ दोन वर्षांसाठी गठीत करण्यात आले असून या प्रकल्पाला नियमितपणे भेट देण्यासाठी ते उपसमिती नियुक्त करु शकतात. ‘चित्ता टास्क फोर्स’ मध्ये मध्यप्रदेशातील वने आणि वन्यजीव विभागातील पाच वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे महानिरीक्षक अमित मलिक आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ विष्णू प्रिया यांचा समावेश आहे. ‘चित्ता टास्क फोर्स’ कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांच्या आरोग्य स्थितीचा आढावा घेईल आणि त्यांचे शिकार करण्याचे कौशल्य तसेच तेथील अधिवासाशी ते जुळवून घेत आहेत का, याचेही निरीक्षण करेल. तसेच ते चित्त्यांच्या विलगीकरणाच्या स्थानापासून तर हळूवारपणे सोडण्यात येणाऱ्या बंदिस्त कुंपणापर्यंत आणि नंतर गवताळ जमीन ते खुल्या वनक्षेत्रापर्यंतचे निरीक्षण करेल.

कारण काय?

कुनो राष्ट्रीय उद्यानात लोक चित्ते कधी पाहू शकतात हे टास्क फोर्स ठरवेल, असे सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये सांगितले होते. त्यानंतर केंद्राने टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

कार्य काय?

कुनो राष्ट्रीय उद्यान तसेच इतर संरक्षित भागात पर्यटनाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत देखील ‘चित्ता टास्क फोर्स’ सूचना तसेच सल्ला देणे अपेक्षित आहे.

Story img Loader