लोकसत्ता टीम
नागपूर: नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांना आता नवीन नावे देण्यात आली आहेत. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात असलेल्या मादी चित्ता ‘अशा’ला ‘आशा’, ‘सवाना’ला ‘नभा’, ‘तिबिलिसी’ला धात्री तर ‘सियाया’ला ‘ज्वाला’ असे नाव देण्यात आले आहे. नर चित्ता ‘ओबान’चे नाव पवन, ‘एल्टन’चे नाव ‘गौरव’ आणि ‘फ्रेडी’चे नाव शौर्य असे ठेवण्यात आले आहे.
नामिबियातून सप्टेंबर २०२२ मध्ये पहिल्या तुकडीत आठ चित्ते भारतात आले होते. दक्षिण आफ्रिकेतून फेब्रुवारी २०२३ मध्ये दुसऱ्या तुकडीत १२ चित्ते भारतात आले. नामिबियासोबतच दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचे देखील नामांतर करण्यात आले आहे. येथील एका मादी चित्त्याचे नाव आता ‘दक्षा’ तर नर चित्त्यांची नावे ‘वायू’ आणि ‘अग्नि’ अशी ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा… घरात एकट्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, त्यानंतर बदनामीच्या भीतीने युवकाने…
प्रौढ मादी चित्त्याचे नाव ‘धीरा’ तर प्रौढ नर चित्त्यांची नावे ‘उदय’, ‘प्रभास’ आणि ‘पावक’ अशी ठेवण्यात आली आहेत. चित्त्यांना नवीन नावे देण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने स्पर्धा घेतली होती. २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आयोजित या स्पर्धेत तब्बल ११ हजार ५६५ नागरिक सहभागी झाले. नुकतीच ही नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केली.