नागपूर : पहिले प्रेम, पहिले ब्रेकअप, पहिला कॉलेज प्रवेश किंवा वाढदिवस अशा अनेक प्रसंगी ‘केक पार्टी’ केली जात असताना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लाखो युवा मित्र-मैत्रिणी यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. अशा नवमतदारांमध्ये मतदानाची जागृती करण्यासाठी ७ एप्रिलला प्रसिद्ध शेफ विक्रमवीर विष्णू मनोहर यांनी आगळ्यावेगळ्या ‘केक पार्टी’ चे नागपुरात आयोजन केले आहे.
दुपारी ४ ते ७ वाजेदरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, धरमपेठ येथे शेफ विष्णू मनोहर या ‘केक पार्टी’ साठी १५ बाय ५ फूट आकाराचा सर्वात मोठा केक तयार करतील. मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. लोकसभा निवडणुकीचे सध्या धुमशान सुरू असून प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावण्याची उत्तम संधी आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले लाखो युवक-युवती पहिल्यांदाच या मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. नवमतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी व नागपूर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून शेफ विष्णू मनोहर यांची ‘एसव्हीप आयकॉन म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे.
हेही वाचा…लोकसभेची उमेदवारी मागणे हा माझा अधिकार – वडेट्टीवार
त्याअंतर्गत ‘मेरा वोट, देश के लिए’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ही ‘केक पार्टी’ आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय व नागपूर जिल्हा निवडणूक कार्यालयाचे सहकार्य लाभले असून त्यांच्याद्वारे युवक-युवतींसाठी मतदार यादी नाव नोंदवण्याची येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.