लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अयोध्यात राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्‍या निमित्‍त ‘विश्‍वविक्रमी’ शेफ विष्‍णू मनोहर येत्‍या, २२ जानेवारीला जगदंबा संस्‍थान कोराडी येथे ६ हजार क‍िलोचा महाप्रसाद तर अयोध्‍येत २६ जानेवारीनंतर ७ हजार क‍िलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करून दोन नवे जागत‍िक विक्रम प्रस्‍थापित करणार आहेत. यासाठी जगातील सर्वात मोठी ‘हनुमान’ कढई तयार करण्‍यात आली आहे. विशेष म्हणजे ही कढई विष्‍णू मनोहर अयोध्‍येतील श्रीराम मंदिराला अर्पण करणार आहेत.

ही हनुमान कढई १५ हजार लिटर क्षमतेची असून १८०० क‍िलो वजन व १५ फूट व्‍यासाची आहे. ही कढई तयार करण्‍यासाठी ६ मी.मी. जाडीचा स्‍टीलचा पत्रा वापरला गेला असून हा पत्रा धरणाची दारे किंवा जहाज बांधणीसाठी उपयोगात आणला जातो. कढईचा तळभाग लोखंड व तांबे या धातूंपासून तयार करण्‍यात आला आहे. तो १० फूट आकाराचा आहे. दोन धातूंचे पत्रे एकावर एक तळाशी लावल्‍यामुळे ते उष्‍णता शोषून घेतील आणि शिरा जळणार नाही. या कढईत वापरला जाणारा एक सराटा हा २४ इंच रुंदीचा असून ३२ क‍िलो वजनाचा आहे. ही कढई विश्‍वकर्मा फॅब्रिकेशन वर्क्‍स, एमआयडीसी, नागपूर येथे नागेंद्र विश्‍वकर्मा व त्‍यांचे वडील अनिरूद्ध विश्‍वकर्मा यांच्‍या देखरेखीखाली तयार करण्‍यात आली आहे. ही कढई घडवायला १५ ते २० कारागीराची मदत घेण्‍यात आली. हे आव्‍हानात्‍मक कार्य करायला जवळपास एक महिन्‍याचा कालावधी लागतो. परंतु, विश्‍वकर्मा पिता-पुत्र आणि कारागीर यांची कौशल्‍यबुद्धी, मेहनत, रामभक्‍ती यांच्‍या जोरावर हे कार्य एक आठवड्यातच पूर्ण झाले आहे.

आणखी वाचा-वाशीम : चक्क रस्त्यावर खाद्यतेल! महिला, पुरुष, लहान मुलांची एकच झुंबड…

येत्‍या, २२ जानेवारी अयोध्‍येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना कोराडी येथील श्रीजगदंबा देवस्‍थानमध्‍ये ६ हजार किलोचा ‘श्रीराम श‍िरा’ तयार केला जाणार आहे. हा एक विश्‍वविक्रम ठरणार असून तो विष्‍णू मनोहर श्री जगदंबा संस्‍थान कोराडीच्‍या नावे समर्पित करणार आहेत. त्‍यानंतर ही ‘हनुमान’ कढई क्रेनच्‍या सहायाने मोठ्या ट्रेलरवर चढवून अयोध्‍येला रवाना केला जाईल. अयोध्‍येत पोहोचायला या कढईला दोन दिवस लागतील.

‘कार सेवा ते पाक सेवा’

मी प्रभू श्रीरामांचा भक्‍त असून वयाच्‍या २२ व्‍या वर्षी ‘कार सेवा’ केली होती. आता अयोध्‍येत राममंदिर साकार होत असताना श्रीरामाच्‍या चरणी ‘पाक सेवा’ देण्‍याच्‍या उद्देशाने या उपक्रमाला ‘कार सेवा ते पाक सेवा’ असे नाव देण्‍यात आले आहे. ‘हनुमान’ कढई अयोध्‍येत पोहोचल्‍यानंतर येत्‍या, २६ जानेवारीनंतर तेथे ७ हजार किलो ‘श्रीराम शिरा’ तयार केला जाणार आहे. हा देखील एक विश्‍वविक्रम ठरणार असून तो श्रीराम मंदिर न्‍यासच्‍या नावे नोंदवला जाईल. त्‍यानंतर ही ‘हनुमान’ कढई श्रीराम चरणी अर्पण केली जाणार आहे, असे ते विष्‍णू मनोहर म्‍हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chef vishnu manohar will cook 7 thousand kg shri ram shira in ayodhya vmb 67 mrj