संजय मोहिते
बुलढाणा : महाराष्ट्र राज्यात लवकरच चेस लीग स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी येथे दिली.बुलढाणा येथे १४ ते १६ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या फिडे मानांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम दिवशी कुंटे यांनी येथे हजेरी लावली. बुलढाणा अर्बन नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढाकाराने सहकार विद्या मंदिरच्या सुसज्ज सांस्कृतिक भवनात ही स्पर्धा घेण्यात आली. १६ एप्रिलला संध्याकाळी उशिरा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यानंतर ‘लोकसत्ता’सोबत अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्य सहसचिव अंकुश रक्ताडे हजर होते. मागील २०१३ मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यानंतरही स्पर्धा घेण्यात आल्या. मात्र, मध्यंतरी विविध अडचणी व करोना प्रकोपामुळे ही स्पर्धा आयोजित करणे अशक्य ठरले. या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र चेस लीग स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा स्पर्धेचा पाचवा ‘सिझन’ असणार आहे अशी पूरक माहितीही राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष असलेले कुंटे यांनी दिली.
हेही वाचा >>>नागपूर: चौकीदाराने पाणी देतो म्हणून घरात नेले, अन….!
असे राहणार स्पर्धेचे स्वरूप
स्पर्धेत २ ग्रँड मास्टर, २ प्रथितयश महिला खेळाडू व दोन महिला खेळाडूंचा सहभाग आवश्यक ठरतो, असे रक्ताडे यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेत उद्योजक अशोक जैन (जळगाव), नरेंद्र फिरोदिया (अहमदनगर), अश्विन त्रिमल (पुणे), वझे (ठाणे), चितळे (सांगली)यांच्या संघासह विदर्भाचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण, दिनांक अजून निश्चित नसून राज्य संघटनेच्या बैठकीत यावर लवकरच निर्णय होणार आहे. बुलढाण्यातील फिडे मानांकन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनांमुळे बुलढाण्याच्या संघाला देखील संधी मिळण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.