गोंदिया : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुढील १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडेल, त्यांचा डेथ वॉरंट निघाला आहे, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, सरकारमधील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी सध्या त्यांच्याकडे १६५ असा बहुमताचा आकडा असल्यामुळे माझ्या मते सध्या तरी सरकारला धोका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई झाल्यास नवीन मुख्यमंत्री राज्याला प्राप्त होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दिली.
ओबीसी एल्गार परिषदेसाठी भुजबळ गोंदियात आले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शिंदे गट ज्या शाळेतून आलेला आहे, त्या शाळेचे उद्धव ठाकरे हे मुख्याध्यापक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेदरम्यान घोषणाबाजी किंवा कोणताही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर ठाकरे गटही भविष्यात तेच करणार. त्यामुळे शिंदे गटाने असे उपद्रव करण्याचा नाद करू नये.
वज्रमूठ सभांच्या माध्यमातून आपण मविआचे प्रवक्तेपद मिळविण्याचा प्रयत्न करीत आहात, या मंत्री उदय सावंत यांच्या अरोपाबाबत भुजबळ म्हणाले, पहिले तर ते पद रिक्त नाही, त्यावर संजय राऊत भक्कमपणे आरूढ आहेत आणि मी यापूर्वी कधीही कोणत्याही पक्षात प्रवक्ते पदावर राहिलेलो नाही. त्यामुळे माझी अशी कोणतीही इच्छा नाही. मी मैदानात लढणारा नेता आहे. त्यामुळे मला माझ्या कर्तबगारीच्या बळावर बाळासाहेबांनी नगरसेवक, महापौर, आमदार केलं. पवारांनीही मला आमदार, उपमुख्यमंत्री केलं. आपण कामगिरी चांगली केली तर पदे मिळत असतात. मध्यंतरी मी शिंदे – फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रालयात महात्मा फुले, आई सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावण्याची मागणी केली होती. त्यांनी ही मागणी त्वरित मंजूर करीत महात्मा फुले, आई सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मंत्रालयात लावली, असेही भुजबळ यांनी सांगितले.