नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला असून मंत्रीपद न मिळालेले नेते संतप्त झाले आहेत. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रीपद मिळते. मला मंत्रीपद मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन देऊनही मिळाले नाही. पण मी नाराज नाही, अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मराठा समाजाचे नेते मनोज जरागे यांच्याशी संघर्ष केल्याचे बक्षीस मिळाले, अशी खंत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाशिकला रवाना झाले. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तानाजी सावंत पुण्याला रवाना झाले. आता दिले तरी मंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे विजय शिवतारे यानी व्यक्त केली. ज्येष्ठ भाजप नेते संजय कुटे यांनीही संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय नेत्यांनी मुनगंटीवार यांच्याबाबत काही वेगळा विचार केल्याने त्यांना मंत्रीपद दिले नसल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न पत्रकारांशी बोलताना केला.

हेही वाचा >>>बुलढाणा : ‘त्या’ आठ नेत्यांविरुद्ध हाय कमांडकडे तक्रारी, ‘या’ आमदारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ….

आता मंत्रीपद नकोच’

शिवसेनेतील अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर,विजय शिवतारे, सावंत आदी नेते मंत्रीपदासाठी इच्छुक होते. आता अडीच वर्षांनी दिले, तरी मंत्रीपद घेणार नाही. महायुतीच्या तीनही नेत्यांनी चुकीची वागणूक दिली असून साधी भेटही दिलेली नाही, असे शिवतारे यांनी नमूद केले. शिवसेनेचे भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रीपद न मिळाल्याने आपल्या पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तानाजी सावंत यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत असून ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फिरकले नाहीत. मी एक सामान्य कार्यकर्ता असल्याने कुठेही, कसेही फेकून दिले तरी चालते, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

●भाजपमध्येही नाराजी असून मुनगंटीवार यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दांडी मारली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली.

●माजी मंत्री रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम शिंदे यांनाही मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र ते न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त करणे टाळले आहे.

●मात्र विधान परिषद सभापती, भाजप प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष अशा जबाबदाऱ्यांपैकी एखादी मिळेल का, अशी आशा ते बाळगून आहेत.

माझ्यावर आई- वडिलांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. दुसऱ्यांचा जीव घेऊन किंवा कूटनीती वापरून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, असे त्यांनी शिकविले आहे. कूटनीती न जमल्याने प्रवाहात बाजूला पडण्याचा प्रसंग माझ्यावर आला असावा. -संजय कुटेभाजप आमदार

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal sudhir mungantiwar unhappy over being left out of cabinet expansion nagpur news amy