नागपूर : आम्ही जरांगे पाटीलसह कोणत्याही मराठा समाजातील नेत्यांच्या नादी लागत नाही आणि जरांगे यांच्या नादी कोण लागणार आहे. मात्र आम्ही ओबीसीवर कोणाला आक्रमण करू देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. ओबीसीमधून त्यांना आरक्षण देता येणार नाही आणि त्यासाठी आमचा लढा सुरू असल्याचे मत ओबीसी समाजाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
छगन भुजबळ नागपुरात बोलत होते. जरांगे पाटील ओबीसीवर आणि माझ्यावर टीका व आरोप करत असेल तर मी काय चुप बसणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे हा जो काय त्याचा आग्रह आणि त्याचे लाड चालले आहे, ते काही कळत नाही. या राज्यामध्ये ५४ टक्के ओबीसी आहे. बाकी सगळे मागासवर्गीय. सगळ्यांनी लक्षात ठेवावे, अशा रीतीने कुठल्याही लहान समाजावर अन्याय होणार असतील तर महाराष्ट्रातील विचारवंत मराठासुद्धा त्याला विरोध करतील असेही भुजबळ म्हणाले.
हेही वाचा – गझलकारांचे स्वतंत्र गझल संमेलन! मराठी साहित्य संमेलनात आणखी एका ‘विद्रोहा’ची भर
कुणबीच्या नोंदी घेतल्या जात आहे. बघू जे काय असेल ते बाहेर पडेल. जोपर्यंत जरांगे पाटील आक्रमकपणे विधान करत राहतील तर आम्हीपण त्यांना उत्तर देऊ. त्यांच्या नादी लागण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही पण ओबीसी समाजावर टीका केली जात असेल तर चुप बसणार नाही आणि आमचा लढा सुरू राहील असेही भुजबळ म्हणाले.
वर्धा सभेला प्रकृती अस्वस्थामुळे जाऊ शकलो नाही. डॉक्टरांनी आराम करायला सांगितले होते त्यामुळे गेलो नाही असेही भुजबळ म्हणाले. आम्ही सगळीकडे सभा घेणार असून ओबीसी समाजाचा जागरण चालू राहील. सभा लहान असली का आणि मोठी असली तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, मात्र आम्ही सभा घेणारच आहे. मराठा समाजाला काय करायचे ते त्यांना करू द्या आणि आम्हाला जे करायचे ते आम्ही करू व सरकारला जे करायचे आहे ते करतील, असेही भुजबळ म्हणाले.