लोकसत्ता टीम

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने ते नाराज आहेत. तशा भावनाही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा विषय सर्वाधिक चर्चेचा आहे. यातूनच भुजबळांचे मंत्रीपद आणि त्याचे नागपूर कनेक्शन याचाही उलगडा झाला आहे.

भुजबळ यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत सर्व प्रथम मंत्रीपद नागपुरातच मिळाले होते आणि नागपुरातच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यातही आले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला आणि अपेक्षेप्रमाणे महायुतीमध्ये असंतोष उफाळून आला. ज्यांची नावे मंत्रिमंडळात असायलाच हवी होती अशांपैकी अनेकांचा मंत्रिमंडळात समावेश नव्हता. यापैकी एक प्रमुख नाव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ याचे.

आणखी वाचा-दादांची अनुपस्थिती, ठाकरेंचे आगमन अन् फडणवीसांची भेट अधिवेशनात काय घडले..

भुजबळ मंत्रीपद अन् नागपूर

भुजबळ शिवसेनेत बंड करून काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले ते नागपूरमध्ये. १९९१ मध्ये सेनेत बंड केल्यावर भुजबळ भूमिगत झाले होते. ते अवतरले ते थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात. त्यांचा मंत्री म्हणून शपथविधी येथेच झाला. हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील पहिले मंत्रीपद होते. मंत्री म्हणून सुरक्षा कवच मिळाल्यावरच ते मुंबईत जाऊ शकले होते. त्यानंतर ते अनेक वर्षे मंत्री होते. २०१९ मध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात ते होते. हे सरकार कोसळल्यावर ते काही काळ सत्तेपासून दूर होते.पण राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा ते अजित पवार यांच्यासोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा महायुती सत्तेवर आली. नागपूरलाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण त्यात भुजबळांचा समावेश नव्हता. नागपूरमध्येच भुजबळांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली होती त्याच नागपुरात त्यांचा मंत्री पदाबाबत अपेक्षाभंग सहन करावा लागला.

Story img Loader