अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जयंतीउत्‍सवाच्‍या एका कार्यक्रमादरम्‍यान प्रमुख वक्‍त्‍याला ‘ए शहाण्‍या, मुर्ख आहेस, का?’ असे म्‍हणत भाषण थांबविण्‍याचा प्रयत्‍न भाजपचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे यांनी केला खरा, पण सभेतील श्रोत्‍यांचा कल पाहून त्‍यांना माघार घ्‍यावी लागली. या घटनेची चित्रफित चांगलीच प्रसारीत झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील शिवटेकडी परिसरात शिवजयंती उत्‍सव कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे हे प्रमुख वक्‍ते म्‍हणून उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज हिंदू की हिंदूत्‍ववादी?’ हा व्‍याख्‍यानाचा विषय होता. खासदार डॉ. अनिल बोंडे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा >>> 12th Exam : विद्यार्थ्यांकडे ‘कॉपी’ सापडल्यास पर्यवेक्षकाची उचलबांगडी!

तुषार उमाळे यांनी आपल्‍या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मुस्‍लीमांचे वैरी अशी चुकीची प्रतिमा आपल्‍या मनात बिंबवण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. ते उदाहरणे देत असतानाच डॉ. अनिल बोंडे यांनी त्‍यांना रोखले आणि एकेरी भाषेत उल्‍लेख करून ‘मुर्ख आहेस का, काहीही बोलू नको’, असे सुनावले. त्‍यावर तुषार उमाळे यांनीही डॉ. बोंडेंना जोरदार प्रत्‍युत्‍तर दिले. दोघांमध्‍ये चांगलीच बाचाबाची झाली. ते कार्यक्रमातून उठून जायला निघाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्‍या इतर मान्‍यवरांनी डॉ. बोंडे यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यानंतर ते पुन्‍हा आपल्‍या स्‍थानी परतले.

हेही वाचा >>> नागपूर : धक्कादायक! रेल्वेतून दारू तस्करीसाठी आता महिलांचा वापर, वाचा…

उमाळे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. ते म्‍हणाले, ‘राज्‍यघटनेने आपल्‍याला अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्य दिले आहे. त्‍याची गळचेपी अजिबात सहन केली जाणार नाही. आपण वडीलधारे आहात, आम्‍ही आपला सन्‍मान करतो, पण एकेरी भाषेत बोलून भाषणात अडथळे आणणे योग्‍य नाही. तुम्‍ही आमच्‍या स्‍वातंत्र्यावर बंधने आणू शकत नाही. ज्‍यांना आपले भाषण ऐकायचे नाही, ते खुशाल सभेतून जाऊ शकतात.’ तुषार उमाळे यांनी नंतर आपल्‍या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज हे कशा प्रकारे अठरापगड जाती-जमातीच्‍या लोकांचा सन्‍मान करीत होते, याची उदाहरणे दिली. डॉ. बोंडे हे नंतर टाळ्या देखील वाजवताना दिसले. या कार्यक्रमात डॉ. बोंडे यांचेही भाषण झाले. पण, कार्यक्रमातील श्रोत्‍यांचा नूर पाहून त्‍यांनी माघार घेणेच पसंत केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharaj during the program mp anil bonde said to the speaker stupid mma 73 ysh
Show comments