चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून आणण्यात येणार आहेत. यासाठी १ ऑक्टोंबर रोजी लंडन येथे जात असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
१ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक खात्याचा मंत्री म्हणून मी स्वत: व या विभागाचे सचिव तथा भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी लंडन येथे जात आहोत. ३ ऑक्टोबर रोजी लंडन येथे वाघनखे भारतात आणण्यासाठी एमओयू होणार आहे. त्यानंतर येत्या नोव्हेंबर महिन्यात वाघनखे भारतात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
हेही वाचा – ऊर्जामंत्र्यांच्या शहरातच १०७ वीजचोऱ्या उघड; महावितरण कारवाई आणखी तीव्र करणार
लंडनचे पंतप्रधान सुनक यांना भेटण्यासाठी वेळ मागितला असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता. वाघनखाच्या सहायाने महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तिच वाघनखे भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सोबत राहतील. महाराष्ट्रात वाघनखे येताच एक मोठा सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.