उपराजधानीत पाच वर्षांहून कमी वयोगटातील मुलांमध्ये ‘हॅन्ड फूट माऊथ’ आजार बळावला आहे. मुलांच्या तळहात, तळपाय आणि तोंडात लहान-लहान पुरळ येणाऱ्या या आजारावर वेळीच नियंत्रण गरजेचे आहे. दरम्यान, मध्यंतरी हा आजार कमी झाल्यावर पुन्हा हे रुग्ण वाढून प्रत्येक १०० पैकी २० मुलांमध्ये हा आजार दिसत असल्याने बालरोग तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होत आहे.उपराजधानीतील बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार डॉक्टरांकडे येणाऱ्या पाच वर्षांहून कमी बालकांमध्ये हा आजार वाढत आहे. मे-२०२२ दरम्यान प्रत्येक १०० मुलांमागे ५ ते ७ रुग्णांमध्ये हा आजार आढळत होता. परंतु त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून हे रुग्ण कमी झाले होते. परंतु, आता पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे.
हेही वाचा >>>भुसावळच्या माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक अपात्र ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का
तूर्तास बालरोग तज्ज्ञांकडे विविध तक्रार घेऊन येणाऱ्या १०० मुलांपैकी सुमारे २० मुलांमध्ये हा आजार आढळत आहे. हा आजार रुग्णाच्या श्वसनमार्गाने शरीरात प्रवेश करतो. रुग्णाचा हात, पाय, तोंडात कांजण्यासदृश्य पुरळ येतात. पुरळ आलेल्या भागावर रुग्णाला वेदना होतात. हा आजार हवेतून पसरत असल्याने त्यावर नियंत्रणासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, उपराजधानीत स्वाईन फ्लू आणि करोना नियंत्रणात दिसत असतांनाच दिवाळीच्या तोंडावर आता या आजाराने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे.
पालकांनी विशेष काळजी घ्यावी
सात वर्षानंतर संबंधित रुग्ण खूपच जास्त संख्येने दिसत आहे. त्यापैकी बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणाचे असले तरी जास्तच त्रास असलेल्या रुग्णांना दाखलही करावे लागते. हा आजार प्रौढांमध्ये दिसत नाही. परंतु यंदा एक-दोन प्रौढांमध्येही डॉक्टरांनी आजार बघितला. त्यामुळे या रुग्णांच्या पालकांनीही आता संक्रमण रोखण्यासाठी जास्त काळजी घ्यायला हवी. त्यानुसार मुलासह स्वत:ही गर्दीत न जाता सात दिवस विलगिकरणात रहावे, या मुलांना सात दिवस शाळेत वा मैदानात इतरांसोबत खेळायला पाठवू नये, रुग्णाला वेळोवेली स्वच्छ करावे, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.– डॉ. ज्योती चव्हाण, संचालक, चाईल्ड केअर सेंटर, नागपूर.
हेही वाचा >>>नागपूर : अजित पारसेचा व्यसनमुक्ती केंद्रात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न
‘टोमॅटो फ्लू’च्याही रुग्णांची नोंद
सात वर्षांखालील लहान मुलांमध्ये ‘हॅन्ड फूट माऊथ’ आजार बळावला असून प्रथमच उपचाराला येणाऱ्या शंभरातील २० मुलांना हा आजार असल्याचे दिसत आहे. परंतु, या आजाराला घाबरण्याची गरज नसून त्यावर नियंत्रणासाठी पालकांनी मुलांसह स्वत:ला संक्रमणापासून वाचण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, उपराजधानीत काही मुलांमध्ये टाॅमेटो ‘फ्लू’चाही आजार आढळत आहे. हा सौम्य आजार असून वेळीच डॉक्टरांचा उपचार घेऊन मुलांची काळजी घेतल्यास तो बरा होतो.– डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ.