यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी धगधगणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख. या विषयात सध्या शासन, प्रशासन आणि एकूणच समाजाच्या संवेदना बोथट झाल्याचे चित्र आहे. मात्र येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आपल्या होवू घातलेल्या विवाहानिमित्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रती ते हळवे असल्याचा संदेश ‘प्री-वेडिंग’ चित्रीकरणातून दिला आहे.
मंदार पत्की यांचा विवाह येत्या १० एप्रिल रोजी डॉ. पद्मीन कनकदंडे यांच्याशी होणार आहे. सध्या विवाह सोहळ्यापूर्वी ‘प्री-वेडिंग शूट’ करण्याचा ट्रेंड आहे. मंदार पत्की प्रशासकीय सेवेत असले तरी त्यांनी आपल्या जोडीदारप्रती असलेल्या हळूवार भावना, आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या संवेदना जपत प्री-वेडिंग शूट मधून व्यक्त केल्या आहेत. ‘शेतकरी’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन केलेल्या त्यांच्या प्री-वेडिंग शूटची सर्वत्र प्रशंसा होत आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या जीवनाशी समरस होऊन केलेले हे शूट केवळ रोमँटिकच नाही तर संवेदनशीलतेने परिपूर्ण असल्याच्या प्रतिक्रिया प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून केलेल्या या चित्रीकरणामुळे यवतमाळसारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रती सीईओ पत्की यांची संवेदनशीलता प्रकट होत असल्याची चर्चा आहे.
मंदार पत्की हे मुळचे बीड जिल्ह्यातील आहेत. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून ते प्रशासकीय सेवेत आले. आयएएस झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची पहिलीच पोस्टींग आहे. त्यांच्या आयुष्यात जीवनसाथी म्हणून आलेल्या डॉ. पद्मीन कनकदंडे या मूळच्या नांदेड येथील आहेत. त्या सध्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘सर्जन’ म्हणून कार्यरत आहेत.
शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचा आदर करीत, त्यांच्या कामाशी आणि संघर्षाशी नातं जोडत या जोडप्याने हे प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. या शूटमध्ये ते शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसतात. आपल्या जोडीदाराशी प्रेमाने संवाद साधत असताना त्यांच्या कर्तव्यभावनेची आणि त्यांची मातीशी जोडलेली नाळ अधोरेखित होते. शेतकऱ्यांबद्दल असलेली सहानुभूती, शेतकऱ्यांचा सारथी असलेले बैल, बैलबंडी आणि त्यांच्या जगण्याचे महत्त्व दर्शवून, मंदार पत्की यांनी त्यांच्या जीवनाच्या या महत्त्वाच्या क्षणाला अधिक अर्थपूर्ण बनवले आहे.
शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यांच्या संघर्षातून आपल्याला जगण्याचे बळ मिळते, या जाणीवेतून वैवाहिक जीवनाची ही सुरुवात करत असल्याचे सीईओ मंदार पत्की यांनी सांगितले. या उच्च शिक्षित जोडप्याने आपल्या आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर शेतकरी कष्टाची जाणीव ठेवल्याने त्यांचा हा प्रयत्न कौतुकास पात्र असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत. हे प्री-वेडिंग शूट सध्या समाज माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल झाले आहे. शेती, माती, प्रेम, निसर्ग आणि नाती यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या प्री-वेडिंग शूटमुळे मंदार पत्की आणि त्यांच्या जीवनसाथीच्या आगामी जीवनातही हेच समर्पण, प्रेम, आणि सामंजस्य कायम राहो, अशी भावना जिल्हा परिषदेत व्यक्त होत आहे.