नागपूर : शहरात सोमवारी झालेल्या दंगलीत जाळपोळ, तोडफोड करीत लाखो रुपयांचे नुकसान केले. या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईल. प्रसंगी दंगलखोरांची संपत्ती विकून ती घेतली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पोलीस आयुक्तालयात केली.
फडणवीस म्हणाले, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळली. त्यावर ‘आयत’ लिहिलेली असल्याची अफवा पसरण्यात आली. समाजमाध्यमातून ती अफवा विशिष्ट गटापर्यंत पोहोचली. त्यानंतर सायंकाळी कटानुसार हंसापुरी, महाल चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा परिसरात दंगल पेटली. दंगलखोरांनी शासकीय संपत्तीसह नागरिकांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. या दगडफेकीत तीन पोलीस उपायुक्तांसह एकूण ४० जण जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि चित्रफितींवरून दंगलखोरांची ओळख पटवण्यात येत आहे. आतापर्यंत १०४ जणांची ओळख पटली असून ९२ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये १२ विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. सर्व दंगलखोरांना अटक होईपर्यंत ही कारवाई सुरू राहील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
दंगल सुनियोजित
नागपुरातील दंगल सुनियोजित वाटते. कारण काही दंगलखोरांनी सकाळपासूनच समाजमाध्यमावर दंगल घडविण्यास प्रोत्साहन देणारे छायाचित्र, चित्रफिती आणि मजकूर प्रसारित केला होता. सायबर पोलिसांच्या माध्यमातून ६८ जणांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
यंत्रणांचे अपयश नाही
ही दंगल गुप्तचर यंत्रणांचे अपयश असे म्हणता येणार नाही. पण, अधिक जास्त ‘इनपुट्स’ गुप्तचर यंत्रणा देऊ शकली असती. गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे सतर्क असती तर कदाचित वेगळे चित्र असते. मात्र तसे झाले नाही, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.
राजकीय पोळी शेकू नका
काँग्रेसकडून जी आढावा समिती स्थापन करण्यात आली त्यात अकोला दंगलीतील आरोपीचा समावेश आहे. त्यामुळे उगाच शहरातील वातावरण बिघडवून राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करू नका. दंगलीचे बांगलादेश आणि मालेगावशी संबंधही समोर येत आहेत. मात्र, पोलिसांच्या तपासाअंती यावर बोलता येईल, असेही फडणवीस म्हणाले.
‘मारहाणीत इरफानचा मृत्यू’ : नागपूर दंगलीतला पहिला बळी ठरलेला इरफान अन्सारी हा वेल्डिंगचे काम करत होता. तो रेल्वेने इटारसीला जायला निघाला. परंतु, रिक्षाचालकाने रस्त्यावरील आक्रमक गर्दी बघून पुढे जाण्यास नकार दिला. अखेर रेल्वे चुकू नये म्हणून इरफान पायीच निघाला. मात्र, जमावाने त्याला घेरले व बेदम मारहाण केली, असा आरोप इरफानचा भाऊ इमरान अन्सारी याने केला. इरफानला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.