नागपूर : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांचा काही तरी गैरसमजुतीतून वाद निर्माण झाला आहे. दोघेही अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत. काहींनी चुकीची माहिती सांगून मतभेद निर्माण केले आहेत. पण दोघेही आपल्या मतदारसंघात प्रभावी असून कोणीही सरकारच्या बाहेर पडणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांमधील गैसमज लवकरच दूर करतील आणि त्यांच्यातील वाद संपेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आदित्य ठाकरे इव्हेंट मॅनेजमेंट करीत असून त्यांना राज्याच्या विकासाशी काही देणेघेणे नाही. अडीच वर्षे काही केले नाही. आता पेंग्विन सेना घेऊन टिवटिव करत आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षांपूर्वी फेसबुक लाइव्ह न करता राज्यात फिरले असते तर ही वेळ आली नसती. शिक्षक परिषदेने उमेदवार द्यायचा आहे. शिक्षक परिषदेकडून नागो गाणार यांचे नाव पाठवले आहे, लवकर त्या संदर्भात निर्णय होईल, असे ते म्हणाले.

केजरीवालांचे वक्तव्य हे ‘नाटक’

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नोटांच्या संदर्भात केलेले वक्तव्य हे केवळ ‘नाटक’ आहे. हिंदूत्व आणि देवीदेवतांच्या संदर्भातील विधान मते मिळवण्यासाठी ते करत असतात. त्यांनी निवडणुकीच्या काळात अनेक वक्तव्ये हिंदूत्वाविरोधात केली आहेत. केजरीवाल पंजाब व गुजरातमध्ये भाजपविरोधात लढत आहेत, त्यामुळे काँग्रेसने ‘आप’ला भाजपची बी टीम संबोधण्यात काही तथ्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

रवी राणांच्या बच्चू कडूंवरील आरोपाची चौकशी करा – काँग्रेस 

मुंबई : आमदार रवी राणा यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केला आहे, त्याची केंद्रीय गुप्तचर विभागाकडून (सीबीआय) व सक्तवसुली संचालनालयामार्फत  चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेले  राणा यांनी केलेले हे आरोप गंभीर असल्याने त्याची चौकशी होणे आवश्यक आहे, जेणेकरून सत्तांतरासाठी कोणी किती पैसे घेतले हे उघड होईल, असे त्यांनी सांगितले.  माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्या एका पत्रावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली. त्याच पद्धतीने सत्तांतराच्या काळात कोणी कोणाला किती पैसे दिले-घेतले गेले याचीही  चौकशी झाली पाहिजे. त्यातून  सत्तांतराचे सत्य बाहेर येईल व अनेकांचे बुरखे फाटतील.  या प्रकरणाची चौकशी केली नाही तर  निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल , असे त्यांनी म्हटले आहे.