लोकसत्ता टीम
नागपूर : मुख्यमंत्री एखाद्या कार्यक्रमाला येणार म्हंटले की त्या कार्यक्रमाची चर्चा आधीपासूनच होते. संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागते. मात्र नागपुरात असे चित्र नाही, २०१४ ते आत्तापर्यंत मधला दोन वर्षाचा अपवाद सोडला तर नागपूरकर देवेंद्र क्ष फडणवीस हेच २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री होते, मधली अडिच वर्ष ते उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते त्यांचे गृह शहर नागपूरमध्ये दर आठवड्याला येतात, बहुतांश कार्यक्रमाला हजेरी लावतात. सोमवारी त्यांनी शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमात उपस्थित राहून स्त्रोत्रही म्हंटले.
शिव तांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे. चांगल्या गुणांची स्तुती ही सकारात्मक ऊर्जा देण्यासह मनोबल उंचावण्याचे काम करते. जिथे कुठे अहंकारासारखी स्थिती निदर्शनास येते त्या अहंकाराला दूर करण्याचे मार्ग आध्यात्मात मिळतात. शिवतांडव स्तोत्राच्या अशा पठणासारख्या कार्यक्रमातून आपण सकारात्मक ऊर्जा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी आज येथे केले.
कामठीतील महादेव घाट परिसरात आज शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रम सोमवारी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, माजी आमदार टेकचंद सावरकर, राजे मुधोजी भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल कामठीतील शिवराज्य प्रतिष्ठानचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या स्वसंरक्षणार्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासोबतच शिव तांडव स्तोत्र पठण यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपला आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. शिव तांडव स्तोत्र पठण या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुकोदगार काढले तसेच येत्या काळातही अशा प्रकारचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.