चंद्रपूर: मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर अधिकाऱ्यांनी स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणू नये तसेच पोलीस दलाकडून मानवंदना देऊ नये, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तशा सूचना मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहे.
मुख्यमंत्री दौ-यावर असताना वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची तसेच पोलीस दलाकडून मानवंदना देण्याची प्रथा आहे. फडणवीस यांनी ती बंद करण्याचा निर्णय घेतला. तशा सूचना जिल्हा पातळीवर अधिका-यांना देण्यात आल्या. या आदेशाचे तंतोतंत पालन करावे असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >>>ईरइ धरण परिसरात अतिशय दुर्मिळ अल्बिनो गढवाल बदक
विशेष म्हणजे फडणवीस यांच्यापूर्वी तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्याची प्रथा बंद केली होती. पुष्पगुच्छा ऐवजी पुस्तक देवून स्वागत करावे, असे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे मुनगंटीवार यांच्या कार्यालयात विविध कार्यक्रमात भेट स्वरूपात आलेल्या पुस्तकांमधून एक मोठे ग्रंथालय तयार झाले आहे.