वर्धा : महाराष्ट्र भाजपातील सध्या सर्वात शक्तिमान नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिल्या जाते. २०१४ मध्ये मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री व आता परत मुख्यमंत्री अशी फडणवीस यांची राजकीय वाटचाल आहे. या वाटचालीत त्यांनी असंख्य सहकारी जोडले. त्यांना राजकीय सत्तासोपान पण चढण्यास मदत केली. मात्र, खरे भाग्यवान राहले ते त्यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणारे पी. ए. खास गोटातील हे सहकारी फडणवीस यांचा विश्वास संपादन करीत अखेर आमदार पण झाले.
आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी मिळालेले संदीप जोशी हे असे एक भाग्यवान म्हटल्या जातात. ते फडणवीस यांचे विश्वासू तर आहेच पण सुमित वानखेडे हे सक्रिय राजकारणात उतरल्यावर जोशी हेच फडणवीस कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्त झाल्याची आठवण काढल्या जाते. यापूर्वी त्यांना विधान परिषद निवडणूक लढण्याची संधी मिळाली होती. पण ते पराभूत झालेत. आता मात्र ते नक्की आमदार होणार. फडणवीस यांचे आमदार होणारे सर्वात पहिले पी. ए. म्हणजे अभिमन्यू पवार. ते लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून आमदार झालेत. ते पण फडणवीस यांचे स्वीय सचिव राहून चुकले.
फडणवीस यांचे सर्वात चर्चेत राहलेले पी. ए. म्हणजे सुमित वानखेडे. त्यांना आर्वी मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळाली आणि गदारोळ उडाला. कारण त्यावेळी आमदार असलेले दादाराव केचे यांची तिकीट कापून वानखेडे यांना उमेदवारी मिळाली. संतप्त केचे बंडखोरीचा झेंडा उभा केला. ही बाब अडचणीची ठरू शकते म्हणून केचे यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारात हजर करण्यात आले होते. शब्द मिळाला आणि आता तिकीट मिळाल्याने तो खरा ठरला. पण या एकाच घटनेने सुमित वानखेडे यांची ताकद दिसून आली. सुमितसाठी काही पण, असे म्हटल्या गेले. वानखेडे आमदार झाले आणि फडणवीस यांचा जीव भांड्यात पडला, अशी प्रतिक्रिया प्रकटली.
चौथे आमदार म्हणजे श्रीकांत भारतीय. ते विधान परिषदेवर निवडून आले आहे. फडणवीस हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय यांची मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून नेमणूक झाल्याचे भाजप नेते अविनाश देव हे सांगतात. भारतीय हे विद्यार्थी परिषदेतून पुढे आले आहेत. या संघटनेचे संघटन सचिव व पुढे भाजपचे प्रदेश सचिव अशी पदे त्यांनी भूषविली. फडणवीस यांच्या सोबत सावलीसारखे वावरणारे हे चार आमदार झालेत. संदीप जोशी हे संभाव्य तर भारतीय हे विधान परिषदेवर तर सुमित वानखेडे व अभिमन्यू पवार हे विधान सभेत आमदार म्हणून पोहचले आहेत.