लोकसत्ता टीम
नागपूर : महापालिकेद्वारे तक्रारींसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या तक्रार निवारण हेल्पलाईनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी ‘रामगिरी’ निवासस्थान येथे लोकार्पण करण्यात आले. तक्रार निवारण हेल्पलाईनद्वारे आता नागरिकांना 155304 या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे.
महापालिका तक्रार निवारण क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक फोनची दखल घेऊन नोंदविण्यात आलेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांकडून अभिप्राय देखील मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मुख्यमंत्री यांना दिली. शहरातील नागरिकांच्या विविध तक्रारी सोडविण्याच्या कामात गती प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे तक्रार निवारण पोर्टल तसेच ‘माय नागपूर’ ॲपची सुविधा यापूर्वी उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधांमध्ये आता थेट फोन करुन तक्रार नोंदविण्याची देखील सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी महापालिका मुख्यालयातील अटल बिहारी वाजयपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये चमू तैनात करण्यात आली आहे.
तक्रार निवारण हेल्पलाईन सोमवार ते शुक्रवारी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत तसेच शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेमध्ये सुरु राहिल. नागरिकांनी मनपाच्या तक्रार निवारण हेल्पलाईनचा लाभ घेऊन 155304 या क्रमांकावर मनपा कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारीबाबतची सविस्तर माहिती देऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.