नागपूर: महायुती सरकारचे खातेवाटप झाले असले तरी जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री असा मार्ग मुख्यमंत्र्यांनी काढल्याची चर्चा आहे. रायगड, सातारा, नाशिक, बीड अशा अनेक जिल्ह्यांत या दाव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर पालकमंत्री नियुक्तीचे आव्हान उभे ठाकले आहे. रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्येही पालकमंत्री पदावरून वाद आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. पालकमंत्री पद कुणाला मिळेल याचे सूत्र त्यांनी यावेळी सांगितले आहे.
बीड संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले…
बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानंतरही बीड प्रकरण अद्यापही शांत झालेले नाही. फडणीस यांनी नागपूरमध्ये बोलताना बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
हेही वाचा : कुंभमेळ्याला जायचंय? भाविकांसाठी रेल्वे आली धावून…
तिघे बसून पालकमंत्री ठरवू
राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात. सरकार म्हणून जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते. सरकारी योजना, विकासकामे, मोठे प्रकल्प, निधीची तरतूद अशी कामे पालकमंत्र्यांच्याच हातात असतात. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षपदही पालकमंत्र्यांकडे असते. त्यामुळे पालकमंत्री पद कुणाला मिळणार यावरून वाद सुरू आहे. बीडचे पालकमंत्री पदे कुणाला मिळणार यावर मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी असे तिघेही बसून आम्ही याबाबत निर्णय घेऊ ,असे सांगितले.
हेही वाचा : अकोला : जप्त आरा मशीनसाठी तब्बल २३ वर्षे संघर्ष; नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षेनेते राहूल गांधी यांनी सोमवारी परभणी येथे भेट घेतली. तसेच येथील घटनेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. काँग्रेसकडून नाटक सुरू आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाबासाहेबांचा दोनदा पराभव केला होता. पंडित जवाहरलाल नेहरुंपासून ते इंदिरा गांधी यांनीही बाबासाहेबांचा अपमान करून संविधानात अनेकदा बदल केला. भाजपचे सरकार सत्तेत येताच इंदु मिल येथील दोन हजार कोटींची जागा विकत घेण्याचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बाबासाहेबांचे स्मारक आम्ही तयार करत आहोत. बाबासाहेबांचे लंडन येथील घरही आम्ही विकत घेतले. दीक्षाभूमी आणि महू येथील स्थळांचा विकासही भाजपने केला आहे. त्यामुळे आरक्षविरोधी काँग्रेसने कायमच बाबासाहेबांचा अपमान केला अशी टीका फडणवीस यांनी केली.