नागपूर : शहरात रविवारी राममय वातावरणात श्रीराम शोभायात्रा काढण्यात आली. शंभर वर्षांपेक्षा अधिकचा इतिहास असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून प्रमुख शोभायात्रा शहरभ्रमणाला निघाली. यानंतर पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगरातील श्रीराम मंदिरातून शोभायात्रेला काढण्यात आली.

शहरातील प्रमुख या दोन्ही शोभायात्द्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदविला. पश्चिम नागपूरमधील शोभायात्रेत भारतीय संविधानाची प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली. देवेंद्र फडणवीस यांनीही संविधानाचे कौतुक करत रामराज्य आणण्याचे संविधान माध्यम असल्याचे सांगितले.

‘गांधींच्या रामराज्यानुसार डॉ. आंबेडकरांनी संविधान बनविले’

पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगरातील श्रीराम मंदिरातून शोभायात्रेला काढण्यात आली. शोभायात्रेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून यामध्ये साकारलेली संविधानाची प्रतिकृती ही विशेष लक्षवेधी ठरली. भारताच्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली. महात्मा गांधी यांना अपेक्षित रामराज्याला अनुरुप संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केले. संविधानात प्रभु श्रीराम आणि सीतामातेचे चित्र आहे. शोभायात्रेत संविधानाची झाकी ही चांगली बाब आहे कारण संविधान हे रामराज्य आणण्याचे उपकरण आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. श्रीराम हे राष्ट्रपुरुष आहेत. सर्वोत्तम राज्य म्हणजे रामराज्य होते, असेही फडणवीस म्हणाले. शोभायात्रा निघण्यापूर्वी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि या उपक्रमाची सुरूवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.

सद्भावनेसह राममय झाले नागपूर

शहरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राममंदिरातून रविवारी रामनवमीच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचे गजर, सजवलेली रथयात्रा आणि भक्तांचा उत्साह यामुळे परिसर राममय झाला होता. या शोभायात्रेला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून श्रद्धेचा जल्लोष व्यक्त केला. मार्च महिन्यातील मध्य नागपुरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर धार्मिक एकतेचा, सलोख्याचा संदेश देत सद्भावनेच्या वातावरणात शोभायात्रेचे सर्व धर्मीय लोकांनी जागोजागी स्वागत केले. पोद्दारेश्वर मंदिरातून शोभायात्रा मोमिनपुरा प्रवेशद्वारासमोरून गेली. अलिकडे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येत परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामुळे अतिशय शांततामय आणि भक्तीमय वातावरण शोभायात्रा या परिसरातून गेली. दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधवांनी फुलांचा वर्षाव करत शोभायात्रेचे स्वागत केले आणि शरबत वितरित केले. यावेळी मोठ्या संख्येत भक्त सद्भावनेच्या वातावरणात चित्ररथांचा आनंद घेताना दिसले. यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला आणि मुलांचाही समावेश होता.