वर्धा: राज्यात महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले आहेत. त्यांचे पुन्हा दमदार येणे हे काहींची अपेक्षा उंचावणारे ठरत आहे. आता फडणवीस हे राज्याचे प्रमुख झाल्याने ते स्वतः दिलेली आश्वासने मार्गी लावतील, असा सूर व्यक्त केेला जात आहे.
फडणवीस यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आशा पल्लवीत केली होती. २०२२ मध्ये ते उपमुख्यमंत्री झाले होते. तेव्हा वर्धेसह काही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे होते. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या दोन सभा घेतल्या होत्या. एका सभेत बोर व धाम धरणावर चर्चा झाली. हे दोन्ही बांधून पाच दशकाचा कालावधी लोटला. पण मुख्य कालवे व अन्य कामांची दुरुस्ती नं झाल्याने वितरण प्रणाली उदध्वस्त झाली आहे. परिणामी. दाराजवळ आलेले पाणी शेतात मात्र येत नाही, अशी शेतकऱ्यांची भावना. बोर धरणातून १६ हजारावर हेक्टर सिंचन अपेक्षित असतांना केवळ दहा हजार हेक्टर क्षेत्रात पाणी पोहचते. फुटलेले कालवे व पाटसरे यामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरून पीकहानी तसेच गावात पूर येण्याचा प्रकार घडतो.
हेही वाचा >>>यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता
धाम धरणातून १५ गावांना पाणीपुरवठा तसेच काही गावात सिंचन सोय होते. परंतु अनेक कामे जीर्ण म्हणून क्षमतेने उपयोग होत नाही. अशा अडचणी मांडण्यात आल्या. त्यानंतर लगेच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी हा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, दोन महिन्यात दुरुस्ती आराखडा तयार करण्यात येईल. निधीची तरतूद करीत डिसेंबर २०२४ पर्यंत दोन्ही धरणाचे काम पूर्ण करण्यात येईल. पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर या आश्वासनाची आठवण करून दिली जात आहे. याविषयी विचारणा केल्यावर आमदार डॉ. भोयर म्हणाले की तांत्रिक अडचणी आल्याने आराखडा तयार होऊ शकला नाही. मात्र आता हा प्रश्न नव्याने मांडल्या जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांना अवगत करीत काम मार्गी लावू.
शेतकऱ्यांच्या प्रश्नास ते अग्रक्रम देतात, हा माझा अनुभव असल्याचे आमदार भोयर म्हणाले. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात सभा घेतली असतांना देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विविध समस्या जाणून घेतल्या होत्या. त्या संदर्भात ते आता काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.