लोकसत्ता टीम
नागपूर : दंगलीमुळे शहरातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात येऊ शकले नाही. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा ते नागपुरात दाखल झाले. शनिवारी सकाळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून लवकरच ते शहरातील दंगलग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने शुक्रवारी रात्री उशिरा नागपुरात दाखल झाले. नागपुरात येताच त्यांनी दंगलीत झालेले नुकसान, जखमी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि आर्थिक नुकसान यासह अन्य बाबींचा आढावा घेतला. तसेच शनिवारी सकाळी शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. यानंतर ते दंगलग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत. महाल, गांधी गेट, चिटणीस पार्क चौक, भालदार पुरा, मोमीनपुरा, हंसापुरी यासह तहसील, लकडगंज, गणेशपेठ या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही तणावग्रस्त भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून या भागात आज सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले होते की, नागपुरातील दंगल ही सुनियोजित असून काही विशिष्ट गटांनी घरात दगड जमा करून ठेवले होते आणि कटाच्या भागानुसार ते पोलिसांच्या दिशेने भिरकवले होते. उसळलेल्या दंगलीत जवळपास शंभरावर वाहनांचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. मुख्यमंत्री या सर्व घटनांचा आढावा घेणार असून नुकसान भरपाई संदर्भात घोषणाही करू शकतात.
हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शहजाद खान अडकले
मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यानेच या दंगलीचा कट रचला असून त्याने पक्षाचा शहर अध्यक्ष फहीम खान आणि शहजाद खान यांना दंगल भटकवण्याची जबाबदारी दिली होती, अशी माहिती सायबर पोलिसांच्या हाती लागली आहे. यू ट्यूबवरील पत्रकार असलेला मोहम्मद शहजाद खान याने 17 मार्चला सकाळीच हिंसा भडकवणाऱ्या पोस्ट आणि काही भाषणे आपल्या यूट्यूब चैनल वर प्रसारित केले होते. त्यामुळे सायंकाळी हिंसाचार होणार हे निश्चित मानले जात होते त्यामुळे दंगलीचा कट सकाळीच शिजला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.