लोकसत्ता टीम

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांना भेट देऊन कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.

फडणवीस सोमवारी दिवसभर नागपुरात होते. त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. सुरुवातीला त्यांनी दाभा स्थित पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संमेलन व प्रदर्शनी केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी अधिकाऱ्यांकडून बांधकामाबाबत माहिती घेतली. वास्तूविशारद हबीब खान यांनी या केंद्राचा आराखडा तयार केला आहे. हे केंद्र मध्य भारतातील सर्वात मोठे केंद्र असणार आहे. सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी छताचा आकार लाटांसारखा करण्यात आला आहे. केंद्राच्या २२ एकर जागेवर सौर उपकरणे लावली जाणार आहेत. त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शनासाठी एक स्वतंत्र सभागृह तयार करण्यात आले आहे.

फडणवीस यांनी सिव्हिल लाईन्समधील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विभागीय क्रीडा संकुल परिसरात उभारण्यात येत असलेल्या स्पोर्ट्स हबच्या कामाचीही पाहणी केली. शहरात सुरू असलेली सर्व कामे गुणवत्तापूर्ण व्हावी, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांसोबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित उपस्थित होते.