नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय प्रतिमेबाबत कायम सजग असतात. त्यासाठी वागणुकीपासून तर वक्तृत्वापर्यंत सर्वच बाबतीत फार काळजी घेतात. शब्दही तोलून मापून उच्चारतात. आपल्याबाबत कुणी अनावधानानेही काही संभ्रम निर्माण करणारे शब्द उच्चारू नयेत, याकडेही त्यांचा विशेष कटाक्ष असतो. फडणवीस जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रमाच्या मंचावर असतात त्यावेळी तर त्यांची स्वत:च्या प्रतिमेबाबतची काळजी अधिक गहिरी होताना अनेकांनी अनेकदा पाहिली आहे. परंतु, दिल्लीत आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर त्यांच्या वाटयाला एक प्रसंग असा आलाच की त्यामुळे फडणवीसांच्या चेहऱ्याचा रंग बदलला.

त्याचे झाले असे की, ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर होत्या. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मंचावर उपस्थित होते. एका पाठोपाठ एक भाषणे होत होती. या क्रमात या संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार हे भाषणासाठी माईकवर आले. हे संमेलन दिल्लीत कसे गरजेचे होते. हे सांगत असतानाच त्यांनी या संमेलनानंतर दिल्लीत मराठीच्याबाबतीत काय बदल होईल, हे सांगायला सुरुवात केली.

ते म्हणाले, मराठी जणांच्या मनात दिल्लीबाबत फार दशहत आहे. या संमेलनाने काय होईल की ही दहशत संपेल आणि महाराष्ट्रातला नेता दिल्लीतून देशाच्या नेतृत्वासाठी पुढे……असे नहार बोलताच. फडणवीस जरा काळजीत पडल्याचे दिसले. नहार आता पुढे काय बोलू इच्छितात, याचा अंदाज त्यांना आला असावा. ऐरवी या वाक्याचा सामना करण्याचा त्यांना बराच सराव झालाय. त्यांनी स्वत: वकिलीचे शिक्षण घेतल्याने अशा अडचणीच्या शब्दातून आपली मान कशी अलगद सोडवायची, हे ते उत्तम जाणतात. पण, येथे चित्र वेगळे होते. कारण, शेजारी दस्तूदखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते.

मोदींच्या राजकारणाची तऱ्हा सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत नहारांचे वाक्य केंद्रीय नेतृत्वासोबतच्या संबंधांना नेमके कुठे घेऊन जाईल. याचा अंदाज फडणवीसांना आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी लकेर उमटली. ती समोर बसलेल्या अनेकांनी बघितली. नहारांनीही ती दिसली असावी कदाचित. तसे नसते तर त्यांनी आपल्या वेगवान भाषणाला अचानक करकचून ब्रेक मारला नसता. तसा ब्रेक अखेर लागला आणि फडणवीसांचा जीव भांडयात पडला.

Story img Loader