नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी दुपारी १२ वाजतानंतर नागपुरात आगमन झाले. त्यांच्या प्रथम नगरागमनानिमित्त नागपूरकर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. “विजेता तू देवाभाऊ…. पुढे चल” हे गाणे त्यांच्या स्वागतानिमित्त वाजवले जात होते व ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांचे १२ तारखेला प्रथम नागपुरात आगमन होणार होते. त्यानिमित्त कार्यककर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. पण तो मुहूर्त टळला. नंतर ते १३ डिसेंबरला येणार असे जाहीर करण्यात आले. पण ही तारीखही चुकली. अखेर १५ डिसेंबरचा मुहूर्त ठरला आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला. विमानतळ ते त्यांचे धरमपेठमधील निवासस्थान असा मिरवणुकीचा मार्ग ठरला. हजारो कार्यकर्ते रविवारी विमानतळावर जमले. तेथून मिरवणूक सुरू झाली. सजवलेल्या ट्रकवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अन्य नेते या ट्रकमध्ये होते व कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारत ही मिरवणूक हजारो कार्यकर्त्यांसह पुढे सरकत होती. वाटेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. विमानतळ चौकातील हेडगेवार स्मारकाला नमन केले. पुढे कार्यकर्त्यांची गर्दी, विविध लोकनृत्य सादर करणारे पथक असे दृश्य नागपूरकरांनी अनुभवले. यात वाजत असणारे गीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते व ते गीत होते ‘विजेता तू.. देवाभाऊ चल पुढे’..‘तुमची आमची सर्वांची भाजप’ व यासह अनेक गीते वाजवली जात होती.
हेही वाचा – वर्धा : विद्यार्थी नेता ते थेट मंत्री, संघटन कौशल्यावर राजमुद्रा उमटली
संपूर्ण शहर सजले
विमानतळापासून तर फडणवीस यांच्या धरमपेठमधील निवासस्थानापर्यंत प्रत्येक चौकांत फडणवीस यांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारले आहेत. अनेक ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले आहेत. विमानतळ ते अजनी चौकादरम्यान मेट्रोच्या डबलडेकर पुलावर प्रत्येक खांबावर फडणवीस यांचे फलक लावण्यात आले आहे. दुचाकीस्वारांनी बाईक रॅली काढली होती. इमारतींवर उभे राहून नागपूरकर नागरिक त्यांचे हात दाखवून स्वागत करीत होते. २०१४ मध्ये फडणवीस प्रथम मुख्यमंत्री झाले त्यावेळीही त्यांचे असेच जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.
हेही वाचा – २३५ कोटी शासनाकडे अडकले; गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांची कोंडी
गडकरीकडून स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये आगमन झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्त्यावर उतरले होते. फडणवीस यांची स्वागत यात्रा खामल्यात आल्यावर तेथील चौकात स्वत: गडकरी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले होते.