नागपूर : शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘नमो किसान सन्मान निधी’मधील राज्याचा वाटा तीन हजार रुपयांनी वाढविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. यामुळे केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे नऊ हजार असे १५ हजार रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतील, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’ १९ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील सभागृहात घेण्यात आला. यावेळी राज्याचे कृषी राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये वितरित करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ वर्षाकाठी ६ हजार रुपयांची मदत देण्यात येते. राज्य शासन या निधीत ३ हजार रुपयांनी वाढ करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वनामती परिसरातील कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनीला भेट देऊन विविध दालनांची पाहणी केली तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

तिजोरीवर आणखी बोजा

लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा निवडणूकपूर्व लोकप्रिय घोषणांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येऊन खर्चात कपात करावी लागली असताना शेतकऱ्यांच्या अनुदानात तीन हजारांनी वाढ केल्याने तिजोरीवरील आणखी बोजा पडणार आहे. त्यामुळे वित्तीय तूट आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात ७० टक्के खर्च करण्याचे आदेश वित्त विभागाने सर्व खात्यांना दिले आहेत.

Story img Loader