चंद्रपूर : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे चंद्रपूरचे बोटॅनिकल गार्डन उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जगातील सर्वोत्तम वर्ल्ड क्लास उद्यान होईल आणि चंद्रपूरच्या वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
विसापूर येथील बोटॅनिकल उद्यानाचे लोकार्पण तथा एसएनडीटी महाविद्यालयाचे ज्ञानसंकुल, चंद्रपूर महापालिकेची अमृत योजना व मलनिस्सारण प्रकल्पाच्या १६६७ कोटी रुपयांच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कळ दाबून चारही विकास कामांचे डिजीटल लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार, सचिव विकास खारगे, वन अधिकारी महिप गुप्ता, वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले उपस्थित होते.
हेही वाचा >>>निवडणूकपूर्व अंतिम बैठकीतही भाजपचाच बुलढाण्यावर दावा!
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुनगंटीवार यांच्यासारखा लोकप्रतिनिधी मिळाल्याने हे सर्व शक्य झाले आहे. अर्थमंत्री व वनमंत्री म्हणून रेकॉर्डब्रेक काम केले आहे. महाराष्ट्राला अशा बोटॅनिकल गॉर्डनची गरज आहे. मी शिवसेनेचा असल्यामुळे वाघांच्या मनात काय आहे हे मला कळत असते. महाराष्ट्राची संस्कृती कशी जोपासायची हे मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक विभागाच्या कामातून दाखवून दिले. चंद्रपूरच नाही तर राज्यात उद्योग येत आहेत. त्यामुळे येत्या दहा वर्षात बेरोजगारी दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे सर्व प्रकल्प मंजूर होत आहेत. निधी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आपले सरकार माझे कुटुंब माझा परिवार इतके मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. निवडणुकीनंतर चंद्रपूरला पुन्हा येतो. मुख्यमंत्री शिंदे हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही, जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून कायदे व नियमात बदल केले. सीएम म्हणजे कॉमन मॅन असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा >>>भंडारा : मित्रच झाले वैरी… हत्या करून नाल्यात फेकला मृतदेह
याप्रसंगी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असताना देखील ठाण्याचा ढाण्या वाघ केवळ चंद्रपूरच्या प्रेमापोटी लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला आल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पिटलसह अनेक उद्घाटन आपल्या प्रतीक्षेत आहेत. मी आताच तुम्हाला निमंत्रण देतो की निवडणुकीनंतर पुन्हा उद्घाटनाला या, असेही मुनगंटीवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच जिंकणार असे त्यांनी सांगितले. ताडोबा महोत्सव जगातील २० कोटी लोकांपर्यंत गेल्याचे सांगितले. तसेच ॲडव्हांटेज चंद्रपूर मध्ये ७५ हजार कोटींचा करार झाल्याचा आनंद व्यक्त करताना भविष्यात येत्या १० वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगारी दूर होईल असेही म्हणाले. यावेळी १६६७ कोटी रुपयांचे भूमिपूजन केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे धन्यवाद मानले. सभेला उपस्थित हजारो लोकांनी मोबाईलचा लाईट लावून मुख्यमंत्री यांच्यासोबत चंद्रपूरची जनता असल्याचे दाखवून दिले. लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णसेवेसाठी सर्वाधिक निधी खेचून आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.
दिल्लीची भीती दूर करावी
चंद्रपूरच्या सागवानचा दरवाजा देशाच्या नवीन संसदेला लागला आहे. या दरवाजातून मला आत जायची भीती वाटत आहे. ती भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वजन वापरून दूर करावी, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
बोटॅनिकल गार्डन तीन महिने मोफत
आजच्या उद्घाटनानंतर पुढील तीन महिने बोटॅनिकल गार्डन सर्वांसाठी मोफत तथा महिलांना तीन महिने ताडोबा मोफत अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली.
मुनगंटीवार यांना लोकसभेत जायचे नाही
कार्यक्रमात मुनगंटीवार म्हणाले की, दिल्लीत बांधण्यात आलेल्या संसद भवनात आणि नुकतेच उद्घाटन झालेल्या राम मंदिरात चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी आत जाण्यासाठी सागवानाच्या या दरवाज्यांमधून जावे लागते, पण त्यांनाही लोकसभेत जावे लागेल अशी भीती वाटते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातली आणि त्यांना हवे असेल तर ते या भीतीतून मुक्त करू शकतात, असे सांगून मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले