राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. राज्यात सत्तांतर होत असताना वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आणि माझ्या पत्नीला सोबत येण्याची खुली ऑफर दिली होती, असे धानोरकर यांनी म्हटले आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या सहा दिवसीय महाकाली क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन खासदार धानोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत धानोरकर यांनी हा गौप्यस्फोट केला.
हेही वाचा- गोंदिया : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार प्रफुल पटेल यांचा पाठिंबा
मंचावर बसलेल्या नव्वद टक्के नेत्यांचा डीएनए हा शिवसेनेचा आहे. आज आम्ही काँग्रेस पक्षात असलो तरी रक्तात व विचारात बाळासाहेबांची शिवसेना आहेच. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राज्यात सत्तांतर झाले तेव्हा शिंदे यांनी आम्हा धानोरकर दाम्पत्याला सोबत येण्याची खुली ऑफर दिली होती. परंतु आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. जोरगेवार अपक्ष आमदार आहेत. त्यांच्यासमोर अनेक पर्याय आहेत. मात्र, भाजपाकडून त्यांना चंद्रपुरातून विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही, हे सत्य आहे. त्यांच्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेना हेच पर्याय आहेत. भविष्यात ते यापैकी एका पक्षाकडून निवडणूक लढू शकतात, असेही धानोरकर म्हणाले.
यावेळी खासदार धानोरकर यांनी भाजपावर टीका केली. बल्लारपूर शहरात भाजपाच्या एका कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अपमान केला. तरीही पोलीस गुन्हा दाखल करण्यास तयार नाही. हा प्रकार योग्य नाही, असेही ते म्हणाले.