संजय मोहिते
बुलढाणा: जालना लाठीमारप्रकरणी पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. उच्चस्तरीय चौकशीनंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. या प्रकरणी प्रसंगी न्यायिक चौकशीही करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.
बुलढाण्यात आज रविवारी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत पार पडलेल्या शासन आपल्या दारी या शासकीय सोहळ्याच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर विखारी टीका केली. यामुळे या शासकीय सोहळ्याला राजकीय सोहळ्याचे किंबहुना एखाद्या जहाल प्रचार सभेचे स्वरूप प्राप्त झाले! शिंदे यांनी विरोधकांवर चौफेर टीका करतानाच जालना लाठीमारप्रकरणी कठोर कारवाईची घोषणा केली.
हेही वाचा >>>स्वस्त धान्य दुकानातील ‘पॉस’ यंत्राचा इंटरनेट सेवेशी संबंध काय? वारंवार कां बंद पडते
यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जालना भेटीवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आक्रमक टीका केली. ज्यांनी मराठा आरक्षणाचा गळा घोटला, तेच काल जालन्यात गळे काढताना दिसले, या शब्दात त्यांनी शरद पवार, अशोक चव्हाण व उद्धव ठाकरे या माजी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविली. दीर्घ काळ सत्तेत असणारे असो की मराठा आरक्षण उपसमिती चे अध्यक्ष अशोक चव्हाण की अडीच वर्षे मुख्यमंत्री राहणारे उद्धव ठाकरे असो यांनी काल जालन्यात उर बडवून घेतले. मात्र त्यांचे अश्रू हे ‘ मगरमच्छ के आंसू’ ( मकराश्रु) होते याची सर्वांना आणि समाजाला जाणीव आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केले ? असा करडा सवाल त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा >>>उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात कर; गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील तांदूळ उद्योग बंद पडण्याचा धोका
जालना मधील लाठीमार ही दुदैवी घटना आहे, त्याचे दुःख मला आणि सरकारलाही आहे. मात्र आपले सरकार हे मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असून (मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा) दिवस आता दूर नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.