लोकसत्ता टीम
बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवसैनिकांसाठी यंदाची दिवाळी खास ठरली. याचे कारण म्हणजे राजकीय व सामाजिक संघर्षाच्या धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संपर्क करून दिवाळीच्या शुभेच्छा देत भेटवस्तू सुद्धा पाठविल्या. या ‘दिवाळी गिफ्ट’ चे आज बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नामदार संदीपान भुमरे कार्यक्रमाला हजेरी लावली.
चिखली मार्गावरील सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात आज शनिवारी दुपारी हा भावस्पर्शी सोहळा पार पडला. यावेळी ना. भुमरे व आमदार गायकवाड यांच्या हस्ते शिवसैनिकांना भेटवस्तू व शुभेच्छा पत्राचे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर युवानेते मृत्युंजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत , उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील यांची उपस्थिती होती.
आणखी वाचा-संग्रामपूर बाजार समितीवर महायुतीचा झेंडा; १२ उमेदवार विजयी, आघाडीला ६ जागा
यावेळी ना. भुमरे यांनी आमदार गायकवाड यांच्या विकासकामाचे कौतुक केले. आमदारांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या मतदार संघाचा विकास करणार असे ते म्हणाले. आपण अनेक वर्षापासून राजकारणात असल्याचे सांगून राजकीय जीवनात काम करीत असताना अनेक खासदार, आमदार मंत्रीची कामे जवळून पाहिली. मात्र आमदारांनी आणलेला प्रचंड निधी व विकासकामे अतुलनीय असल्याचे ते म्हणाले. आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या विकास योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. या भेटवस्तू व शुभेच्छा लक्षात घेता, मुख्यमंत्री सामान्य शिवसैनिकाबद्धल किती संवेदनशील आहे याचे द्योतक असल्याचे ते म्हणाले. काही नेते ओबीसी व मराठा आरक्षण वरून राजकारण करीत असल्याचा आरोप करून त जनतेने त्याला बळी पडू नये. मुख्यमंत्री कोणालाही धक्का न लावता मराठा आरक्षण देतील असे त्यांनी निक्षून सांगितले.