नागपूर : बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा केली जाईल. त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. विरोधकांनी या विषयावर राजकारण करण्यापेक्षा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
नाणारमध्ये रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प बारसूमध्ये आणण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठीच्या सर्वेक्षण आणि माती परीक्षणाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर पोलीस बळाचा वापर करण्यात आला. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करीत सर्वेक्षणाचे काम थांबविण्याची मागणी केली. नागपूरला एका कार्यक्रमानिमित्त आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत भाष्य केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘या प्रकल्पाबाबत शरद पवार यांच्याशी माझी फोनद्वारे चर्चा झाली. रिफायनरीबद्दल उद्योगमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तेथील विश्वासात घेतले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. ती योग्य असून, आम्ही भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेणार आहोत.’’ मुख्यमंत्र्यांनी यावेळी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचा दाखला दिला. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊनच आम्ही समृद्धी महामार्ग केला. बारसूतील शेतकऱ्यांनाही विश्वासात घेतले जाईल. सध्या तिथे माती परीक्षण करीत आहोत. त्यानंतर पुढची प्रक्रिया होईल. मात्र, तिथल्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल होईल, असे शिंदे म्हणाले.
‘ठाकरेंच्या प्रश्नांना रोज उत्तर देण्याची गरज नाही’
उद्धव ठाकरे यांच्याबाबत मी काही बोलू शकत नाही. ते रोज बोलतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना रोज उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही विकासकामांतून त्यांना उत्तर देत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रकल्प विरोधकांना विश्वासात घेऊनच रिफायनरीचे काम सुरू केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळोवेळी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे काही होण्यापूर्वीच नियोजित जागेत कार्यालय, तंबू-राहुटय़ा आणि अन्य सुविधा निर्मितीचे काम सुरू आहे.