अकोला : संत श्री सेवालाल महाराज यांनी कुठलाही भेदभाव न करता माणुसकीवर प्रेम करा, सर्वांना सोबत घेऊन प्रगती करण्याचा संदेश दिला होता. तेच तत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले. केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नात महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या वेगात विकास होत असल्याचे ते म्हणाले.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोहरादेवी येथे नंगरा वास्तू संग्रहालय व शेतकरी सन्मान संमेलनामध्ये ते बोलत होते. पुढे मुख्यमंत्री म्हणाले, नंगारा संग्रहालयाच्या लोकार्पणाचा ऐतिहासिक क्षण आहे. बंजारा समाजाची संस्कृती, परपंरेचे दर्शन संग्रहालयातून घडते. संत श्री रामराव महाराजांनी पंतप्रधान एकदा पोहरादेवीच्या पुण्यभूमीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो योग आज जुळून आला. प्रथमच देशाचे पंतप्रधान पोहरादेवी येथे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सर्वांगीण प्रगती साधत असून भारताला महाशक्ती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

हेही वाचा >>>तेंडुलकर कुटुंबासह पोहोचला गडकरींच्या घरी…गडकरींनी दिला एकच सल्ला…

डबल इंजीन सरकारमुळे बुलेट ट्रेनच्या वेगात महाराष्ट्र विकसित होत आहे. विरोधकांना ते पचनी पडत नाही. राज्याची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे षडयंत्र विराेधक करीत आहे. मात्र, ही योजना कधीही बंद पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नरेंद्र मोदींचे बंजारा समाजाशी विशिष्ट नाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंजारा समाजाशी विशिष्ट नाते आहे. ते पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी बंजारा समाजाची काशी पोहरादेवीला भेट दिली. बंजारा समाजाच्या भव्यदिव्य वास्तू संग्रहालयाची आज स्वप्नपूर्ती होत आहे. शेतकऱ्यांना बळकट करण्याचे कार्य केंद्र व राज्य सरकारकडून केले जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

हेही वाचा >>>दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार, दोघे जखमी…

बंजारा संस्कृतीचे दर्शन घडेल – अजित पवार

पोहरादेवी येथील नंगारा वास्तू संग्रहालय बंजारा समाजाच्या परंपरेचे प्रतीक ठरणार आहे. या वास्तूतून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडेल. ७०० कोटी रुपयांच्या निधीतून आकर्षक व भव्यदिव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. ते संपूर्ण देशात लोकप्रिय ठरेल. मंदिराचे देखील काम पूर्ण होणार आहे. पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कुठेही कमी पडू दिला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाची दूरदृष्टी ठेऊन कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील विकासाची गाडी वेगाने धावत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde statement regarding development of bullet train in maharashtra ppd 88 amy