विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार विप्लव बाजोरिया यांच्यावर शिवसेनेच्या प्रतोदपदाची मोठी जबाबदारी सोपवली. विधान परिषदेत सत्ताधारी शिवसेनेचे बाजोरिया एकमेव आमदार आहेत. उर्वरित सेनेचे आमदार हे ठाकरे गटात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतोदपद सोपवलेले आमदार विप्लव बाजोरिया नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न राजकीय वर्तुळात आता चर्चिला जात आहे.
हेही वाचा- ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’चा हिशोब नेमका कुणाकडे? नागपूर विद्यापीठ म्हणते, ३१ मार्चनंतर माहिती देऊ
उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ करण्याच्या उद्देशाने एकनाथ शिंदेंनी विधानपरिषेदत आपला प्रतोद नियुक्त करण्यासाठी उपसभापतींना पत्र दिले. विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदारांपैकी केवळ आ. विप्लव बाजोरिया एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांच्या गळ्यात प्रतोदपदाची माळ टाकण्यात आली. आगामी काळात आ. बाजाेरिया आणि ठाकरे गटातील इतर आमदारांमध्ये राजकीय सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा- नागपूरमधील गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कोलदांडा कोणाचा?
विप्लव बाजोरिया हे अकोल्यातील शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे सुपूत्र आहेत. २०१८ मध्ये विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून विप्लव बाजोरिया रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचा ३५ मतांनी पराभव केला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत युवा आमदार म्हणून विप्लव बाजोरिया थेट वरिष्ठ सभागृहात दाखल झाले. मराठवाड्यातून मुलाला निवडून आणल्यामुळे गोपीकिशन बाजोरियांचे शिवसेनेत वजन वाढले होते. अकोला, बुलढाणा व वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सलग १८ वर्षे आमदार राहिल्यानंतर गोपीकिशन बाजोरियांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्याकडून डिसेंबर २०२१ मध्ये धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासाठी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीदेखील कारणीभूत ठरली. त्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
हेही वाचा- नागपूर : लग्नाच्या दिवशीच विवाह प्रमाणपत्र मंडपात..! नवदाम्पत्य मारताहेत महापालिकेत चकरा
जिल्ह्यातील शिवसेनेत आमदार नितीन देशमुख यांचे महत्त्व वाढत गेल्याने गोपीकिशन बाजोरिया पक्षात अस्वस्थ झाले. अखेर गोपीकिशन बाजोरियांनी आमदार पूत्र विप्लव व आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व सूत्रे बाजोरियांच्या हातात दिले. निधी वाटपावरून मतभेद झाल्याने बाजोरियांवर त्यांच्याच समर्थक पदाधिकाऱ्यांकडून आरोप सुद्धा झाले. दरम्यान, वडिलांसोबत एकनाथ शिंदेंच्या गटात जाणे आमदार विप्लव बाजोरिया यांच्या आता चांगलेच पथ्यावर पडले आहे. आमदारकीच्या पहिल्याच ‘टर्म’मध्ये आ. विप्लव बाजोरियांची थेट पक्ष प्रतोदपदी वर्णी लागली. या नियुक्तीमुळे शिवसेनेत बाजोरिया पिता-पुत्राचे महत्त्व वाढले आहे. प्रतोद आ. विप्लव बाजोरिया यांचा ‘व्हिप’ उद्धव ठाकरेंसह त्यांच्या गटाचे आमदार मानणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.