वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा आर्वी दौरा जिल्ह्यातील आमदा्रांसाठी चांगलाच फलदायी ठरल्याचे चित्र उमटले. आर्वी येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, समीर कुणावार, राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील ६५ टक्के जंगल आर्वी मतदारसंघात असून बहुतांश शेतकरी वन्य प्राण्यांच्या हिंस्त्र हल्यांनी गारद होतात. शेतीची कामे होत नाही. १२ शेतकऱ्यांचा बळी गेला. शेतकरी जीव मुठीत घेऊन जगतात, असा त्रागा खासदार काळे यांनी भाषणातून व्यक्त केला. तर पालकमंत्री डॉ. भोयर यांनी भारतातील सर्वात लहान पण कोणत्याही विमानतळ पासून सर्वात जवळ असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पची समस्या मांडली. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ही समस्या लवकरच दूर होईल. त्यावर काम सूरू आहे. एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यवस्थापन प्रणाली राज्य सरकार विकसित करीत आहे. ज्यामुळे वाघ किंवा अन्य हिंस्त्र पशू यांचा वावर लक्षात येईल. त्यांच्या आगमनाची पूर्व सूचना मिळेल. त्यामुळे हल्ले रोखता येतील. तसेच पर्यंटकांना आनंद घेता येईल. लवकरच ते लागू होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पंतप्रधान सौर ऊर्जा घर या योजनेच्या माध्यमातून अनेकांना दिलासा मिळणार. राज्यातील ३०० युनिट पेक्षा कमी वीज जाळणाऱ्या ग्राहकांना या योजनेत आणायचे व त्यांना मोफत वीज द्यायची, अशी भूमिका आहे. तसेच शेतकऱ्यांना पण या योजनेच्या माध्यमातून दिवसा अखंडित १२ तास वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून त्याला रात्री सिंचन करण्याचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस याचया हडतर प्रशासकीय भवन लोकार्पण करण्यात आले.तसेच गांधी विद्यालय व जलतरण तलाव लोकार्पण, उपजिल्हा रुग्णालय, उपसा सिंचन, नेरी सौरग्राम प्रकल्प, कारंजा तालुका रस्ते विकास व अन्य अशी ७२० कोटी रुपये किमतीची विकास कामे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मार्गी लावण्यात आली. आयोजक आमदार सुमित वानखेडे यांच्या कार्यपद्धतीची फडणवीस यांनी प्रशंसा केली. तसेच त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मोठा भाऊ नागपूर प्रमाणेच लहान भाऊ असलेल्या वर्धा जिल्ह्यावर मुख्यमंत्र्यांनी कृपादृष्टी ठेवावी, अशी विनंती केली.