यवतमाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी आज मंगळवारी विनायक चतुर्थीचा मुहूर्त साधत कळंब येथे श्री चिंतामणी मंदिर देवस्थानला भेट दिली. जवळपास एक ते दीड तास मुख्यमंत्री यादव चिंतामणी मंदिर परिसरात रमले. यावेळी त्यांनी श्री चिंतामणीची मंदिराच्या गाभाऱ्यात जावून पूजा, आरती व अभिषेक केला. ‘श्री चिंतामणी सर्वांचे मंगल करतील, सर्वांवर कृपादृष्टी करतील’, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर आ.मदन येरावार, आ.डॉ.अशोक उईके, राळेगावचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावरून ते थेट कळंब येथे गेले. चिंतामणी मंदिर देवस्थान संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाभाऱ्यात जावून चिंतामणीचे दर्शन घेतले तसेच पूजा व प्रार्थना करून अभिषेक केला. संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. चिंतामणी मंदिराचा संपूर्ण इतिहास यादव यांनी यावेळी जाणून घेतला. संपूर्ण मानव जातीचे श्री चिंतामणीने कल्याण करावे, सर्वांवर कृपादृष्टी ठेवावी, अशी प्रार्थना श्री चिंतामणीकडे केल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले. यावेळी राळेगावचे आ. डॉ.अशोक उईके, विवेक महाराज, संस्थानचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, सचिव बसवेश्वर माहुलकर, विश्वस्त शाम केवटे, चंद्रकांत गोसटवार, रमन बोबडे, शैलेश साठे, त्र्यंबक वाके आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>बिबट शिकारीच्या मागे धावला अन्ं विहिरीत पडला, पण मग जे घडले…
गुरुंच्या आज्ञेवरून दर्शन
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे मध्यप्रदेशातील आनंदी महाराज यांचे भक्त आहेत. तर आनंदी महाराज हे कळंब यथील श्री चिंतामणीचे भक्त आहेत. आनंदी महाराज अनेकदा कळंब येथे दर्शनासाठी येतात. डॉ. यादव मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कळंब येथे चिंतामणीच्या दर्शनसाठी जावे, अशी आनंदी महाराज यांची इच्छा होती. त्यामुळे डॉ. यादव हे आज खास कळंब येथे श्री चिंतामणी दर्शनासाठीच आले होते. मंदिर परिसरात बराच वेळ घालविल्यानंतर त्यांनी चिंतामणी मंदिराच्या प्रासादालयात सहकाऱ्यांसह भोजन केले. त्यानंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्याच आग्रहापोटी भाजप कार्यालयातही भेट दिली.
हेही वाचा >>>दोनशे फ्लॅटस असलेल्या इमारतीत स्वतंत्र मतदान केंद्राची सोय ?
यवतमाळातही विविध कार्यक्रम
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॅा.मोहन यादव यांनी यवतमाळ शहरानजीक असलेल्या पंडित दीनदयाल प्रबोधिनीलाही भेट दिली. याठिकाणी त्यांनी पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. संस्थेच्या कार्याची चित्रफित त्यांना दाखविण्यात आली. यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, विजय कद्रे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. इतर कोणतेही राजकीय भाष्य त्यांनी या दौऱ्यात केले नाही.