चंद्रपूर : बिजापूर मध्ये ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. यामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले असून गडचिरोलीतील अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवादाशी आमची शेवटची लढाई सुरू आहे , असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वराेरा येथे महारोगी सेवा समिती आनंदवनच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशात गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नाने नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीत देखील आम्ही तेच पुढे राबवत आहोत. देशातील छत्तीसगड, झारखंड, मिझोरम, तेलंगणा, आंध्रप्रदेश या भागातही अशाच प्रकारे नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न चालला आहे. गडचिरोलीत नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरू झाली असून महत्त्वाच्या कॅडरने आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलवाद हा समूळ नष्ट करून असा अशावाद फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.