लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुती, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. देश, धर्म, राष्ट्रीयता, समाजातील मूल्य आणि आदर्शांची चिंता नसणारी ही महा ‘अडाणी’ आघाडी आहे, अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी आज केली. वाशीम येथे महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारार्थ बुधवारी दुपारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवारासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. देशात कुठेही राष्ट्रीय सन्मानाला ठेच पोहोचते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण होते. देशाच्या स्वामिमान व सन्मानासाठी महाराजांचा संघर्ष होता. आजही त्यांच्या प्रेरणेतून देश व समाजासाठी कार्य केले जात आहे.

आणखी वाचा-७५ पैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता…रणथंबोरच्या जंगलात जे घडतेय…

१९४७ पासून निरंतर सत्ता चालवण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती. मात्र, काँग्रेसने देश आणि राष्ट्रीयत्वासाठी कधीही इमानदारीने कार्य केले नाही. ही तीच काँग्रेस आहे, ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, त्यांचा निवडणुकीत पराभव होण्यासाठी प्रयत्न केले होते. भारताच्या सुरक्षेचा काँग्रेसनेच खेळखंडोबा केला होता. देशात एक वेळ अशी होती की, पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करत होता, देशात घुसखोरी सुरू होती. देशात कुठेची बॉम्बस्फोट घडवून आणले जात होते. चीन भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करीत होता. काँग्रेसच्या नेत्यांना मात्र संबंध बिघडण्याची काळजी होती, देशाची चिंता नव्हती, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारत आहे. आता भारताकडे वाकड्या नजरेने बघितले तरी ‘सर्जिकल स्ट्राईक’ होऊन अर्धा पाकिस्तान भीतीने थरथरायला लागतो. चीनचे सैनिक माघारी जात आहेत, तर भारतीय सैनिक गस्त घालत असल्याचे चित्र आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

आणखी वाचा-राहुल गांधी हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विरोधी…

‘५०० वर्षांत झाले नाही, ते मोदींच्या नेतृत्वात झाले’

५०० वर्षांत जे कार्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारून झाले. आता केवळ अयोध्याच नाही, तर काशी व मथुरेकडे देखील वळलो आहोत. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अभियानाला विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राने बळ द्यावे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister of uttar pradesh and bjp leader yogi adityanath criticized mahavikas aghadi in vashim ppd 88 mrj